मिलिंद माने
महाड : महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहरातील गवळ आळीमध्ये दिवसाढवळ्या घराचा दरवाजा फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांचा ऐवज लंपास करण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे.
महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे सत्र चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिवसाढवळ्या महाड शहर पोलिसांना आव्हान देत महाड शहरातील मध्यवर्ती वस्तीतील गवळ आळीमधील वामन स्मृती बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर घरफोडी करण्यात आली. महाड शहरातील गवळ आळीमधील वामन स्मृती इमारतीमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या मजल्यावरील सिद्धेश दत्तात्रय दिघे यांच्या घरी कोणी नसल्याने संधी साधून दुपारी अडीचच्या सुमारास बाजूच्या रहिवाशांच्या घराला कड्या लावून बाहेरून तसेच दरवाज्यावरील इतर रहिवाशांच्या आय होलला बाहेरून स्टिकर लावून दिघे यांच्या घराचा दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे गंथन, हार आणि दोन आंगठ्या असा अंदाजे अडीच लाख किमतीचा ऐवज लंपास करून व घरातील सामान अस्तव्यस्त पसरवून चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत सिद्धेश दिघे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून महाड शहर पोलीस ठाण्याचे घटनेचा तपास करत आहे. त्याच बरोबर दुसऱ्या घरफोडीच्या मिळालेल्या माहिती नुसार शहरातील काजलपुरा या ठिकाणी अमर पॅलेस या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर नंदकुमार जगन्नाथ जाधव यांचा २०२ नंबरचा बंद फ्लॅट चोरांनी ३:१५ वाजता दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला.