• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड शहरात एका दिवसात सहा घरफोड्या!

ByEditor

Feb 28, 2024

अपुऱ्या संख्या बळामुळे पोलीस हतबल?

मिलिंद माने
महाड :
शहरात दिवसाढवळ्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहा घर फोड्या करण्यात चोरटे यशस्वी झाले असले तरी अपुऱ्या पोलीस संख्या बळामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली असून चोरट्यांसाठी पोलिसांनी युद्धपातळीवर शोध मोहीम चालू केली आहे.

महाड शहरात मंगळवारी (27 फेब्रुवारी) दुपारपासून सायंकाळपर्यंत तब्बल सहा घरफोड्या करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे पसार झाले असले तरी नागरिकांनी केलेल्या आव्हानामुळे पोलिसांनी शोध मोहीम मोठ्या प्रमाणावर चालू केली असून श्वान पथकाद्वारे व पोलिसी यंत्रणेचा वापर करीत महाड शहर पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू केले आहेत. मात्र, अपुऱ्या संख्याबळामुळे पोलिसांना गुन्हेगारांना शोधण्यास काही प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. मात्र, त्या परिस्थितीवर देखील मात करून महाड शहर पोलिसांनी युद्धपातळीवर काम चालू केले आहे.

महाड शहरात मंगळवारी दुपारी 27 फेब्रुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारापासून चोरट्यांनी महाड शहरात घरफोड्यांचे सत्र चालू केले. दुपार ते सायंकाळपर्यंत गवळ आळी येथील सिद्धेश दत्तात्रय दिघे यांचे बंद घर उघडून लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. काजळपुरा येथील नंदकुमार जगन्नाथ जाधव यांच्या घरी व दस्तुरी नाका येथील अजय दत्तात्रय मांगडे यांच्या घरी केली. मात्र, या ठिकाणी कोणताही ऐवज सापडला नाही. त्यानंतर महाड एसटी बसस्थानक परिसरातील तिरुपती इमारतीमध्ये दीपक तुळशीराम मोरे यांच्या घरी मौल्यवान ऐवज लंपास केला. गोमुख आळीमधील शिवाजी शंकर मोरे यांचे घर फोडून आठ हजाराची रक्कम लंपास केली व कोटेश्वरी तळे या ठिकाणी चोरट्यांनी शरद कांत शिंदे यांच्या घरी घरफोडी करून ऐवज लंपास केला मात्र किती मुद्देमाल चोरीला गेला याचा तपास अद्याप चालू आहे.

हुशार चोरटे’
महाड शहरात मंगळवारी झालेल्या सहा चोऱ्यांमध्ये चोरटे इतके हुशार होते की, एखाद्या इमारतीमध्ये चोरी करताना दहा ते पंधरा मिनिटात ते घरफोडी करून निघून जात होते. मात्र, घरफोडी करत असताना आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून ते चोरी करत व दरवाज्यावरील आय होलला बाहेरून कागद चिटकवून ते चोरी करत म्हणजे आजूबाजूच्या रहिवाशांना काहीच करता येत नव्हते. त्यामुळे चोरटे इतके हुशार आहेत की, पोलिसांपुढे त्यांनी तपासात मोठे आव्हान निर्माण केले आहे

पोलिसांची अपुरी संख्या प्रशासन कधी वाढवणार?
महाड शहर हे कोकणातील मध्यवर्ती शहर असून या शहरात असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक, चवदार तळे तसेच वीरेश्वर देवस्थान अशी ऐतिहासिक स्थळे असून या ठिकाणी दररोज शासकीय अधिकारी व मंत्री यांची कायम वर्दळ असते. यामुळे या पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचा मोठा ताण पडतो. त्यासाठी पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे असताना अपुऱ्या संख्या बळावर महाड शहर पोलीस कार्यरत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. सध्या महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची मिळून संख्या 75 आहे. मात्र, सध्या तीन अधिकारी व 18 कर्मचारी रिक्त आहेत. महाड शहर पोलीस ठाण्याकडे महाड शहर वगळता आजूबाजूच्या 22 गावांचा देखील कार्यभार असल्याने अपुऱ्या संख्याबळामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. वास्तविक महाड शहर पोलीस ठाण्याकडे 200च्या आसपास अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या असणे गरजेचे आहे. मात्र, अपुऱ्या पोलीस संख्या बळामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना 24 तास कर्तव्य पार पाडावे लागत असल्याने रोजच्या कामाच्या व्यापामुळे पोलीस हतबल झाले आहेत.

महाड शहर हे पर्यटन व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असताना पोलीस ठाण्याकडे फक्त एकमेव वाहन आहे. त्यामुळे या एका वाहनाच्या आधारावर पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या गृहखात्याने महाड शहर पोलीस ठाण्याकडे अजून एका वाहनाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!