मागण्या पूर्ण करा अन्यथा बेमुदत आंदोलनाचा वितरण कंपनीला इशारा
शशिकांत मोरे
धाटाव : रोह्यातील महावितरण कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने बुधवार, २८ ते गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी शहरातील धनगर आळी येथील साईबाबा मंदिरामध्ये जमून दोन दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कंत्राटी संघटनेने महावितरण कंपनीसमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या ५ मार्चनंतर बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा कंत्राटी कामगार संघटनेने दिला आहे.
महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये त्यांच्या प्रमुख २७ मागण्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन, वेतनामध्ये ३० टक्के पगारवाढ मिळावी, बेसिक व पुरक भत्ता मिळावा, नियमितपणे सेवेत रुजू करावे, वयोमर्यादा समान असावी, कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, कामगाराचा काम करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याला ४ लाखाऐवजी १५ लाखांपर्यंत मदत मिळावी, मंत्री महोदय व वरीष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत झालेल्या ईती वृत्तान्त यांची अंमलबजावणी व्हावी, मेडिक्लेम म्हणून कामगारांना पाच लाखाची योजना सुरू करावी, भरती प्रक्रियेला ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती द्यावी, सेवेतील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कामगारांना ग्रॅच्युइटी म्हणून रक्कम द्यावी, कंपनीत कामगार सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना सेवेत सामावून घेणे यासह अनेक मागण्या महावितरणच्या कंत्राटी कामगार संघटनेने महावितरणाच्या कंपनीसमोर ठेवलेल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन त्यापेक्षा तीव्र करु असा गर्भित इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ रायगड जिल्हा सचिव सुधीर शिर्के यांनी दिला आहे.