अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. त्यात गुरुवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील हरिओम इलेक्ट्रीक अँड हार्डवेअर स्टोअरच्या दुकानाचे बंद कुलूप शटर तोडून ३० हजारांची रोकड, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तिनिधी ठाकूर यांना मिळताच त्यांनी सदर घटनेची माहिती उरण पोलीसांना दिली. उरण पोलीसांनी घटनेचे पंचनामे करून अज्ञात चोरांचा शोध सुरू केला आहे.
हरिओम इलेक्ट्रीक अँड हार्डवेअर स्टोअरचे मालक काळूराम देवाशी यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितले की, बुधवारी (दि. २८) आम्ही नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर बंद करून गेलो होतो. मात्र, गुरुवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास कोणीतरी सदर दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडलं असल्याचे सांगितले. सदर घटनेची माहिती दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तिनिधी ठाकूर यांना दिली. सरपंच किर्तिनिधी हसुराम ठाकूर, उपसरपंच अभिजित वसंत पाटील यांनी झालेल्या घटनेची माहिती उरण पोलीसांना तात्काळ दिली. पोलीस यंत्रणेने झालेल्या घटनेची पाहणी केली असता दुकानातून ३० हजारांची रोकड, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीस गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटे जेरबंद होऊ नये यासाठी चोरट्यांनी सीसीटिव्ही संच लंपास केले असल्याचे समजते.
उरण तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. त्यात पुन्हा एकदा अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन दिघोडे नाक्यावरील हार्डवेअरचे दुकान लुटण्याची घटना घडली आहे. तरी उरण पोलीसांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून अज्ञात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे अशी मागणी दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तिनिधी ठाकूर यांनी केली आहे.