• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अमरवेलीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण!

ByEditor

Feb 29, 2024

मिलिंद माने
महाड :
ऐन पावसाळ्यात भातपिक घेतल्यानंतर त्याच शेतजमिनीत कडधान्याची पुरक शेती शेतकरी करतात. येथील भातपिकाचे उत्पादन मोठे नसले तरी कडधान्याला मात्र बाजारपेठेत मोठी मागणी आहे. महाड तालुक्यातील शेतकरी कडधान्य पीक मोठ्या प्रमाणात घेतात. मागणी आणि कडधान्याला उत्तम दर मिळत असला तरी शेतकरी या कडधान्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शेतजमिनीत मोठया प्रमाणात अमरवेल पसरत असून अमरवेलीचा हा विळखा वाढतच चालला आहे. अनेक उपाय करून देखील शेतकऱ्यांची डोकेदुखी कायम आहे.

महाडमधील शेतकरी पावसाळयात मोठया प्रमाणात भातपीकाची लागवड करतात. पारंपारीक पध्दतीने केली जाणारी ही भात शेती येथील शेतकऱ्याचे उत्पन्नाचे साधन नसुन हे भाताचे पिक केवळ घरी खाण्यासाठी वापरात येते. पण खरीप हंगामात येथील शेतकरी कडधान्याची शेती करतो. यामध्ये प्रामुख्याने तुर, मुग, पावटा, वाल, मटकी, चवळी, हरभरा आदींची लागवड केली जाते. या पिकाला बाजारात मोठया प्रमाणात मागणी असुन चांगला भाव देखिल मिळतो. त्यामुळे दळी जमीनी व्यतीरीक्त नदी, ओढे, बांधाऱ्या शेजारील शेत जमीनींमध्ये कडधान्याची लागवड येथील शेतकरी करताना दिसत आहे. महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्टा, वरंध विभाग, बिरवाडी, वाळण आदी परीसरात कडधान्याची लागवड केली जाते. या कडधान्यामध्ये वाल अगर पावट्याला थंडीच्या दिवसात पोपटीकरीता फार मागणी आहे. कडधान्याचे पिक फायद्यात असताना देखील शेतकरी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या दुर्लक्षामुळे परजिवी वर्गातील अमरवेलचा विळखा मोठया प्रमाणवार दिसू लागला आहे.

अमरवेल ही पर्णहीन परजीवी वनस्पती आहे. ही वनस्पती औषधी असुन तीचा वापर पित्त विकार, चर्मरोग, अमांश, मुत्रविकार इत्यादीवर गुणकारी आहे. हीला वाढण्याकरीता कोणत्याही झाडाच्या खोडाची गरज भासते. ही वनस्पती म्हणजे पिवळया, पोपटी रंगाचे शाखायुक्त वेलीचे जाळे असते. ती इतर वनस्पतीवर वाढताना अपली लहान नाजुक शोषके त्या वनस्पतीच्या खोडात घुसवुन पौष्टीक अन्न घटक शोषून घेते. यामुळे अमरवेल वाढते. मात्र, त्यामुळे झाडाचे अगर पिकाचे मोठे नुकसान होते. अमरवेल पिकातील पोषक तत्व शोषून घेत असल्याने येणारे कडधान्य चांगल्या दर्जाचे येत नाही.

या वनस्पतीच्या निमुर्लनासाठी कोणतेच प्रभावी औषध अगर तण नाशक बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे वेळोवेळी लक्ष ठेऊन ही वनस्पती ओढुन काढायची आणि तीचा नाश करायचा हा एकच उपाय आहे. मात्र, येथील शेतकरी शेताकडे दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत आहे. अमरवेलीच्या बिजाचा प्रसार पक्षी करत असल्याने आणि अमरवेलीच्या बियांचा सुक्त कालावधी सुमारे दहा वर्षाचा असल्याने याबाबत केवळ शेतकरीच नव्हे तर कृषी विभागाने सक्रीय होवून उपाय योजनांचा ठोस कार्यक्रम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. कोकण कृषी विद्यापीठाने याबाबत संशोधन सुरु केले असून त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अमरवेल आटोक्यात आणण्यावर ठोस उपाय निघालेला नाही. अमरवेलीचे मुळ शेतातून नांगरणीनंतर देखील नष्ट होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी पिकबदल करणे गरजेचे आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकरी या प्रक्रियेकडे लक्ष देत नाहीत. यामुळे अमरवेलीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

भरत कदम,
तालुका कृषी अधिकारी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!