सामवेदा लॉजिस्टिक इन्फ्रा रिसॉर्सेस प्रा. ली. कंपनीतील आग लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
विठ्ठल ममताबादे
उरण : ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील कंठवली येथे असलेल्या सामवेदा लॉजिस्टिक एन्फ्रा रिसॉर्सेस प्रा. ली. वेअर हाऊसमधील मालाला अचानकपणे आग लागली होती. या लागलेल्या आगीत सुमारे १७,५६,१७,५००/- रुपये (सतरा कोटी छपन्न लाख सतरा हजार पाचशे) इतक्या किमतीच्या मालाचे नुकसान झाले होते. या लागलेल्या आगीचा तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरु होता. शेवटी या आगीमागील खरे कारण समोर आले आहे. खरे कारण समोर आल्याने अनेकांना आश्चर्यचा धक्काच बसला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार सामवेदा लॉजिस्टिक वेअर हाऊसमधील सुमारे १,९७,८२,५०० रुपये किमतीचा माल (सुपारी मालाच्या ५०० गोणी-प्रत्येक गोण ५० किलो वजनाची-एका गोणीची किंमत ३९,५६५ रुपये) दिनांक ७/१/२०२४ रोजी २०:३० वा. ते दिनांक ८/१/२०२४ रोजी १.४५ वा.चे दरम्यान वेअर हाऊसमधील मालाची चोरी झाली. विशेष म्हणजे हि चोरी त्याच वेअर हाऊसमधील कामगारांनी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. शिवाय चोरीची घटना कोणाला समजू नये म्हणून कामगारांनीच वेअर हाऊसच्या मालाला आग लावल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कंपनीला आग लावण्याच्या अगोदर वेअर हाऊसमधील माल दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. अधिक तपास केला असता सुमारे दोन कोटी रुपयांचा माल चोरी करून अगोदरच दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आला व नंतर कंपनीतील (वेअर हाऊसमधील) मालाला कामगारांनी व इतर त्यांच्या साथीदारांनी जाणूनबुजून आग लावली. या लावलेल्या आगीत वेअर हाऊसमधील सतरा कोटी छपन्न लाख सतरा हजार पाचशे रुपयाचे नुकसान झाले होते. सदर घटनेत वेअर हाऊसमधील मालाला लागलेली आग हि नैसर्गिक लागली नसून चोरी केलेला माल लपविण्याच्या उद्देशाने लावण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर चोरी करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम ३८०,३८१,४३६,४२७,१२०(ब ),३४ या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.
रोमेश सुर्यकांत भुवड (वय २५ वर्षे, रा. उरण), सिध्देश विजय रहाटे (वय २६ वर्षे, रा. उरण), किरण दशरथ पंडीत (वय ४० वषे, रा. कळवा, ठाणे), दिगंबर आनंदा वानखेडे (वय ५५ वर्षे, विंधणे, ता. उरण), संजय शंकर घाग (वय ५१ वर्षे, रा. विंधणे, ता. उरण), सचिन चंद्रकांत कदम (वय 36 वर्षे, रा. वाशी नाका, चेंबूर (पूर्व), मुंबई), पांडुरंग उर्फ पंड्या लक्ष्मण शेरेकर (वय ३३, रु. घणसोली गाव, नवी मुंबई) व त्यांचे इतर साथीदार अशी त्या चोरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
कोणालाही चोरीचे पुरावे सापडू नयेत याची पुरेपूर खबरदारी या आरोपींनी घेतली होती. चोरीचे पुरावे सापडू नयेत यासाठी वेअर हाऊसमधील केबिन व केबिनमध्ये असलेले प्रिंटर, महत्वाची कागदपत्रे, संगणक, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर व स्क्रीन, पंखे, एचपी, कंपनीचा प्रिंटर, दोन हॅन्ड ट्रॉली, इन व आऊट बॉण्डचे नोंदी असलेले रजिस्टर असे दहा लाख किमतीचे साहित्य व वस्तूंना आग लावण्यात आली. मात्र, सामवेदा लॉजिस्टिक वेअर हाऊसमध्ये आग लागली नसून आग लावण्यात आली होती. तसेच चोरीची घटना लपविण्यासाठी आग लावण्यात आली होती हे सत्य बाहेर येताच उरणमधील नागरिकांनी या घटनेवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे विभाग) सूर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे, सपोनि अनुरुध्द गिजे, सपोनि शिवाजी हुलगे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुशांत दुड्डे, पोलीस उपनिरीक्षक सुरज कांबळे, पोलीस शिपाई माळशिकारे यांनी केला. उरण पोलीस स्टेशनच्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसी तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.