मिलिंद माने
महाड : शहरातील भाजी मंडईमध्ये असलेल्या एका वेल्डिंग दुकानदारास जमाव जमवून त्याच्या दुकानासमोर मारहाण केल्या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग पद्माकर वडके (रा. काकरतळे, महाड) यांचे महाड शहरात भाजी मंडई या ठिकाणी वेल्डिंगचे दुकान आहे. शहरातील सुनील तांबडे (रा. गवळआळी, महाड) यांनी काही वस्तू पराग वडके यांच्याकडे बनवण्यास दिल्या होत्या. त्यामधून रॅक बनून दिला नाही. यासंदर्भात सुनील तांबडे यांनी शुक्रवारी वडके एका टपरीवर चहा पित असताना विचारणा केली. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद निर्माण झाला. तांबडे त्या ठिकाणाहुन निघून गेले आणि मुलगा (नाव माहीत नाही), निगडेकर (पूर्ण नाव माहित नाही) व इतर १५ जणांच्या जमावाने वडके यांच्या दुकानासमोर येऊन त्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये वडके यांच्या पायाला आणि बरगडीला दुखापत झाली आहे. फिर्यादीनुसार सुनील तांबडे, त्यांचा मुलगा, निगडेकर आणि अन्य १५ इसम असे एकूण १८ आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात भादंवी कलम १४७/१४९/३२३/३२४/४०३/५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.