नामयज्ञ सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
किरण लाड
नागोठणे : श्रीक्षेत्र नागोठणे येथील श्री संत सेवा मंडळाच्या वतीने अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन श्री ज्ञानेश्वर मंदिरात करण्यात आले आहे. यावेळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे श्रीक्षेत्र नागोठणे येथे मंगळवार, दि.12 मार्च ते शुक्रवार, दि. 15 मार्च 2024 या कालावधीत अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. इवलसे रोप लवियेले व्दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी या संताच्या अंभगाप्रमाणे सन 1974 साली वै. हभप सिताराम रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठण्यातील सर्व वारकरी, ग्रामस्थ एकत्र येऊन श्री संत सेवा मंडळाची स्थापना केली. गेल्याच वर्षी मंडळाने सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला होता. यंदा मंडळाचे 51वे वर्षे असून विविध धार्मिक कार्यक्रम माता जोगेश्वरी मंदिर व श्री ज्ञानेश्वर मंदिर परिसरात संपन्न होणार आहेत. मंगळवार, दि. 12 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजता गुरुवर्य हभप विठोबा महाराज मांडलुस्कर यांचे प्रवचन तर रात्री 9 ते 11 वाजता गुरुवर्य हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, धाटाव, रोहा यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. बुधवार, दि. 13 मार्च रोजी संध्याकाळी प्रवचनरुपी सेवा गुरुवर्य हभप अमृत महाराज मोरे रासळवाडी, पाली यांची होणार आहे तर रात्री किर्तनरुपी सेवा हभप किरण महाराज कुंभार, धोंडसे, पाली यांची होणार आहे. गुरुवार, दि. 14 मार्च रोजी हभप जगन महाराज कदम वरप, पेण यांचे संध्याकाळी सुश्राव्य असे प्रवचन होईल तर रात्री हभप अनंत महाराज मोरे, श्रीक्षेत्र देवाची आळंदी हे आपल्या गोड आवाजात कीर्तन करून भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहेत. शुक्रवार, दि. 15 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 11.30 वाजता काल्याचे कीर्तन गुरुवर्य, पंढरपूर मठाधिपती, हभप नारायणदादा वाजे यांचे होणार आहे. त्यानंतर दिंडी सोहळा होऊन सर्व भक्तांसाठी, ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद झाल्यानंतर या अखंड नामयज्ञ सोहळ्याची सांगता होणार आहे.
अखंड नामयज्ञ सोहळ्या वेळी श्री ज्ञानेश्वर मंदिरात सकाळी 4 ते 6 यावेळेत काकड आरती, सकाळी 8.30 ते 12.30 आणि दुपारी 2 ते 4.30 या दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7.30 वाजता हरिपाठ, रात्री 9 ते 11.30 वाजता कीर्तन तसेच रात्री भजन व जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अखंड नामयज्ञ सोहळ्यानिमित्त श्री ज्ञानेश्वर मंदिर नागोठणे येथे करण्यात आले आहे. या नामयज्ञ सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी, ग्रामस्थ तसेच बंधू-भगिनींनी घ्यावा असे आवाहन श्री संत सेवा मंडळाचे अध्यक्ष हभप रतन हेंडे व त्यांचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त यांनी केले आहे.