मिलिंद माने
महाड : शहरातील घरफोडी व चोरीच्या घटनेवरून मागील काही दिवसापासून शहरातील वातावरण तणावपूर्ण असतानाच शनिवार, ९ मार्च रोजी ५:४५ ते ५:५० वाजण्याच्या दरम्यान शहरातील दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मधील तांबट आळीतील मुख्य शाखेजवळील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न एका चोरट्याने केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महाड शहर पोलिसांनी अत्यंत शिताफिने तीन तासाच्या आत या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यासोबत त्याच्या एका साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
महाड शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून बंद घरांचे कुलूप फोडून मोठ्या प्रमाणात घरफोडीचे प्रमाण वाढले होते. पोलीस प्रशासनाची चोरट्यांनी झोपच उडवून टाकली होती. मात्र, पोलीस घरफोडीमध्ये चोरांना पकडण्यात अयशस्वी ठरत होते. असे असताना अचानक शनिवार, ९ मार्च रोजी ५:४५ ते ५:५० वाजण्याच्या दरम्यान शहरातील दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड मधील तांबट आळीतील मुख्य शाखेजवळील याच बँकेचा एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न एका चोरट्याकडून करण्यात आला. मात्र, सीसीटीव्हीच्या आधारे महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा कसोशीने मागोवा घेत असताना शहरातील गाडीतळ भागात यात्रेमध्ये एटीएम फोडणारा चोरटा शराफत अजमत खान रा. राजस्थान खेळण्याचे दुकान लावून बसला असल्याचे महाड शहर पोलीस ठाण्याचे पो. हवा. निखिल वारडे आणि पो. कॉ. राम सेवक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तेथून पळ काढला. या दोन्ही पोलिसांनी जवळपास एक किलोमीटर पाठलाग करत महाड बाजारपेठेतील अय्यंगार बेकरीजवळ त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंर या एटीएम फोडीमध्ये दुसरा साथीदार गुलाब ईलयास खान रा. हरियाणा याचे नाव समोर आले असता त्याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
महाड शहरातील एटीएम चोरी प्रकरणात दोन आरोपींना तीन तासात पकडण्यास पोलिसांना यश आल्याबद्दल सर्व स्थरावरून समाधान व्यक्त केले जाते आहे.