देवेंद्र दरेकर
पोलादपूर : तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पाऊस पडताच तालुक्यामध्ये ठीकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मंगळवारी रात्री आंबेनळी घाटात दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर आज पुन्हा घाटामध्ये मोठ्या दरडी कोसळल्याची घटना घडली आहे.

पोलादपूर मार्गे प्रतापगड-महाबळेश्वर-सातारा अशा वाहतुकीसाठी मुख्य मानल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची घटना घडली असून रस्त्यावर मोठमोठ्या दगडी व मातीचा मोठा ओसरा आला होता. दरड कोसळल्यानंतर मंगळवारी रात्री पावसाचा जोर देखील असल्याने व घाटामध्ये वारंवार दगडी कोसळत असल्याने रात्री दरड बाजूला करण्यात आली नसून बुधवारी सकाळी दरड बाजूला करण्यात आली. परंतु, त्यानंतर पुन्हा घाटामध्ये दरड कोसळली आहे. पावसाचा जोर असल्याने घाटामध्ये मातीचे ओसरे व दगडी वारंवार कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबेनळी घाट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे दरीच्या बाजूचे सुरक्षा कठडे देखील तुटले आहेत तर रस्त्याला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे घाटातील धोका अधिक वाढला आहे.

घटनास्थळी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, महाड डीवायएसपी शंकर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर, बांधकाम अभियंता, कर्मचारी, नरवीर रेस्क्यू टीमचे सदस्य आपत्कालीन साहित्यसह उपस्थित असून दरडी हटवण्यात आल्या आहेत. मात्र पुन्हा दरडीचा धोका कायम आहे.
