अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शासकीय नियमांची पायमल्ली करून माती व डेब्रिज भरलेल्या डंपरची रेलचेल सुरू आहे. त्यामुळे प्रवाशी नागरिकांच्या रस्त्यावर धूळ निर्माण होत आहे. या धूळ आणि खड्ड्यांचा सामना करीत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे करोनानंतर पुन्हा एकदा तोंडाला मुखपट्टी (मास्क) लावून प्रवास करण्याची वेळ प्रवाशी नागरिकांवर आली आहे. तरी रस्त्यावरील वाढणार प्रदुषण टाळण्यासाठी रस्त्यावर पसरणारी माती हटविण्यात यावी यासाठी हातात बॅनर घेऊन शेकापक्षाचे युवा तालुकाध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी अनोखं आंदोलन छेडले आहे.

उरण तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवरून दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा असते. या अवजड वाहनांच्या तुलनेत ग्रामीण भागातील बांधलेले रस्ते हे कमकुवत व निकुष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे रस्ता तयार केल्या नंतर काही महिन्यांतच या रस्त्यांना भले मोठे खड्डे पडतात.अशा खड्ड्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे कण हवेत पसरत आहेत. त्यात सध्या तालुक्यातील सर्रास रस्त्यावरुन माती, डेब्रिज भरलेल्या डंपरची रेलचेल शासकीय नियमांची पायमल्ली करून सुरू असल्याने रस्त्यावर सांडणारी व हवेत पसरणारी माती प्रवाशी नागरिक, वाहन चालकांच्या नाका, तोंडांत जाऊन नागरिकांना, वाहन चालकांना श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत असून अनेक नागरिकांना सर्दी, खोकला, दमा या आजारांनी ग्रासले आहे.
उरण तालुक्यातील वाढते प्रदुषण टाळण्यासाठी आणि ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच रस्त्यावर पडणारी माती हटविण्यासाठी शेकापचे युवा तालुकाध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी नूकतेच हातात बॅनर घेऊन रस्त्यावर अनोख्या स्वरुपाचे आंदोलन उभारुन निद्रिस्त प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.