• Tue. Jul 1st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भविष्यात घरे वाचवायची असतील तर गावठाण विस्तार होणे गरजेचे आहे -राजाराम पाटील

ByEditor

Mar 12, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
आज उरण हे तिसरी मुंबई ओळखले जात आहे. येथील जमिनीला सोन्याहून जास्त किंमत आहे. शासनाच्या विविध प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील गावे बाधित होणार आहे. शासन वेगवेगळे प्रकल्प, योजना, उपक्रम आणून उरण मधील स्थानिक भूमीपुत्रांचे जमिनी संपादित करून स्थानिक भूमीपुत्रांना देशोधडीला लावत आहे.गावे विविध प्रकल्प मुळे बाधित होऊन प्रत्येकाचे घरे तुटणार आहेत. त्यामुळे भविष्यात आपल्या घरावर कोणत्याही प्रकारची जप्ती होऊ नये किंवा वर्षानुवर्षे राहत असलेले घर तुटू नयेत यासाठी सर्वांनी जात धर्म राजकारण बाजूला ठेवून गावठाण विस्तार करून गावठाण विस्तारला शासनाकडून मंजूर करून घेतल्यास घरे वाचतील अन्यथा घरी उद्ध्वस्त होतील यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावागावात बैठका घ्यायला पाहिजे.ग्रामसभेत गावठाण विस्तार ठराव पास केला पाहिजे. गावठाण विस्तार बाबत गावोगावी बैठका घेऊन जनजागृती केली पाहिजे. पूर्वजांपासून आपण राहत असलेले घर तुटू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. असे आवाहन गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी सारडे येथे केले.

उरणमध्ये विविध प्रकल्प येत आहेत विविध प्रकल्पामुळे अनेक गावांची जमीन शासन संपादित करणार आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांची जनतेची बाजू एकूण न घेता शासनातर्फे विविध प्रकल्प साठी जमीन संपादनाचे काम सुरु आहे.जमीन तसेच गावांमधील घरे शासन विविध कारणे सांगून अनधिकृत ठरवत आहेत.या पार्श्वभूमीवर जमीन, घरे,गावे वाचण्यासाठी गावठाण विस्तार या विषयावर श्री राधाकृष्ण मंदिर सारडे,तालुका उरण येथे गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते.बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. शासनावर अवलंबून न राहता लोक वर्गणी काढून आपल्या जमिनीचे, घराचे मोजमाप करावे. जमीन किंवा घर मोजण्यासाठी शासनावर अवलंबून राहू नये. लोकवर्गणीतुन गावठाण विस्तार चळवळीला अधिक बळ मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकवर्गणी गोळा करून प्रत्येक ग्रामपंचायतने, गावातील ग्रामस्थांनी गाव, घरे मोजली पाहिजेत व गावठाण विस्तार साठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.यावेळी सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी समितीच्या एक वर्षाच्या कामाचा आढावा घेऊन सीमांकन व शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली .या सभेला सरपंच रोशन पाटील,आवरे सरपंच निरुताई पाटील,गोवठणे सरपंच प्रणिता म्हात्रे, पिरकोन सरपंच कलावती पाटील,सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील,समाधान म्हात्रे,सुनील वर्तक,रसिक पाटील, मुकुंद गावंड,कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नागरिकांनी गावठाण विस्तार संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले. या प्रश्नांना राजाराम पाटील यांनी योग्य व समर्पक असे उत्तरे देऊन नागरिकांच्या शंकांचे समाधान केले. अनेक नागरिकांच्या वेगवेगळ्या गैरसमजुती होत्या त्या दूर केल्या.वशेणी, पुनाडे, पाणदिवे, सारडे, पिरकोन, आवरे, गोवठणे आदी विविध गावातून ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सारडे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक या बैठकीला मोठया संख्येने उपस्थित होते.या सर्वांनी गावठाण विस्तार बाबत आमच्या गावातही बैठक घेऊ व गावठाण विस्तार चळवळ अधिक व्यापक करू असा दृढ निश्चय केला.या सभेला नागरिकांचा, ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सारडे ग्रामविकास समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सभेचे उत्तम नियोजन केले.गावठाण विस्तार चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी आम्ही गावात जाऊन पत्रके वाटून, बैठका घेऊन जनजागृती करणार असल्याचे सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!