अनंत नारंगीकर
उरण : शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम जिर्ण झाले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कोणीही रहिवाशी वास्तव्य करु नये यासाठी प्रत्येक इमारतींना उरण नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे सदर इमारतींमध्ये कोणीही रहिवाशी वास्तव्य करत नाही. मात्र, सदर इमारतीचा काही भाग रहदारीच्या रस्त्यावर कोसळला तर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती प्रवाशी नागरिक व्यक्त करत आहेत.

उरण शहरात सुमारे ७२ इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. अशा इमारतींना उरण नगरपरिषदेने नोटीसा बजावून सदर इमारतीमध्ये कोणीही रहिवाशी वास्तव्य करु नये यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, मोडकळीस आलेल्या इमारतींचा काही भाग हा रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावर कोसळण्याच्या स्थितीत आहे. एकंदरीत गजबजलेल्या रस्त्यावर सदर इमारतींचा भाग कोसळला तर प्रवाशी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती प्रवाशी नागरिक व्यक्त करीत आहेत. तरी उरण नगरपरिषदेने जीवितहानी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी केली आहे.
