विनायक पाटील
पेण : 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं असताना व रायगडसहित काही जागांवर वाद चालू आहेत. अलिबागमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाच्या काही पुढाऱ्यांनी सुनील तटकरे हे लोकसभेचे उमेदवार गृहित धरून महायुतीच्या बैठकीचे आयोजन केले होते. ही बातमी कळताच भाजपचे जिल्ह्यातील कार्यकर्ते आक्रमक होऊन राज्यातील भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्यानंतर सदर बैठकीचा घातलेला घाट रद्द करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना पेण-सुधागड-रोहा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रसाद भोईर यांनी तीव्र आक्षेप घेतला असून जोपर्यंत रायगड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणीही आतताईपणा करू नये व महायुतीतील एकजुटीपणाला सुरुंग लावण्याचं काम करू नये असा सबुरीचा सल्ला वजा इशारा घटक पक्षातील पुढाऱ्यांना दिला आहे.
भाजपचे धैर्यशील पाटील यांना भाजपतर्फे 32 रायगड लोकसभेचा संभाव्य उमेदवार म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आशीर्वाद दिला व त्यातूनच त्यांनी संपूर्ण रायगड लोकसभा क्षेत्रात मोठमोठे मेळावे घेत भाजपासाठी संपूर्ण पोषक वातावरण तयार केले होते. संपूर्ण मतदारसंघातून धैर्यशील पाटील यांच्या स्वच्छ चेहऱ्याला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतू तटकरे यांच्यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून विद्यमान खासदार असल्याने उमेदवारीसाठी जोर लावला जात आहे. यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजपच्या रायगडमधील कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये कोणतेही वाद नकोत या भूमिकेतून तात्पुरते शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. नेते मंडळींच्या आदेशाचे पालन करत पक्षशिस्तीचे पालन केले. परंतू जर का घटक पक्षांनी आतताईपणा केल्यास भाजप कार्यकर्तेही शांत राहणार नाहीत व त्याचे परिणाम भविष्यात दिसून येतील अशी भावना रायगड जिल्ह्यातून सर्वच भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
भाजपने अद्यापही रायगड लोकसभेसाठी आग्रह धरला असून विविध सर्वेमधून धैर्यशील पाटील यांना पसंती दिसून आल्याने विद्यमान खासदार व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असूनही सुनील तटकरेंची उमेदवारी अद्यापही जाहीर झाली नाही. यातूनच पडद्यामागे बरीच घडामोडी घडत आहेत हे नक्कीच दिसून येत आहे. भविष्यातील स्वतःचे राजकीय इमले बांधण्यासाठी भाजपाला गृहीत धरून महाराष्ट्र व दिल्लीपर्यंत चुकीचा मेसेज पोहचविण्यासाठी कोणी जाणूनबुजून खोडसाळपणा करत असेल तर भाजपाला हे अजिबात चालणार नाही.
महायुती म्हणून काही मार्गदर्शक तत्वे आहेत. भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवीशेठ पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेनेचे भरत गोगावले, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे सर्व महायुतीचे नेते एकत्र बैठकीला उपस्थित राहत नाहीत तोपर्यंत कुण्या एका तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आम्ही म्हणजे संपूर्ण रायगडमधील महायुतीच समजून अनधिकृत बैठक घेण्याचा प्रयत्न करू नये. असा सबुरीचा सल्ला वजा इशारा पेण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिला आहे.