आठ ग्रामसेवकांसहित पाच सरपंचांचा समावेश
प्रतिनिधी
अलिबाग : मुरूड तालुक्यातील गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत हेतुपुर्वक चुकीच्या नोंदी व बनावट दस्त तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याने रेवदंडा पोलीस ठाण्यात मुरूड गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत दिनांक 01/01/2005 ते दि. 31/12/2022 दरम्यान मौजे कोर्लई ग्रामपंचायत येथे एकूण 13 आरोपित सर्व रा. मुरुड ता. मुरुड यापैकी ग्रामसेवक दिलीप तुरे, ए. आर.पाटील, अनिल चवरकर, विनोद मिंडे, ज्ञानेश्वर पातेरे, डी. डी. वेटकोळी, वेदिका म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे या आठ ग्रामसेवकांसहित तत्कालीन सरपंच भगीरथ पाटील, प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, पिटकूर यांनी वैयक्तीक लाभ होणेकरीता आपसांत संगनमत करून कोर्लई ग्रामपंचायतीचे गावठाण मिळकतीत व गावठण क्षेत्राबाहेरील मिळकतीवर नियमबाह्य बांधकाम परवानगी व दुरूस्ती परवानगी देवून ग्रामपंचायत मिळकत नोंदवहीत त्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी व विहीत प्रक्रीयेचा अवलंब न करता परस्पर कर आकारणी केली तसेच काही मिळकतींवर प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम नसताना ग्रामपंचायतीकडून मिळकत कर आकारणी करून हेतुपुर्वक चुकीच्या नोंदी व बनावट दस्त तयार करून शासनाची फसवणूक केली तसेच लोकसेवक म्हणून ग्रामपंचायत मिळकतींचे लेखांचे जतन करण्याची जबाबदारी असताना सुध्दा सदरचे महत्वाचे दस्तऐवज आरोपीतांनी पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने नाहीसे केले.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.147/2023 भा.दं.वि.क. 420,465,466,468, 204,166,167,218,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे हे करीत आहेत.