• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बनावट सोने तारण ठेऊन अभ्युदय बँकेची सुमारे 43 लाख रुपयांची फसवणूक

ByEditor

Mar 22, 2024

घनःश्याम कडू
उरण :
येथील त्रिकुटाने संगनमत करून अभ्युदय बँकेत बनावट सोने तारण ठेऊन बँकेची सुमारे 43 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात शेवा पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला ही फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी उरण शहरानजीकच्या द्रोणागिरी नोडमधील इमारतीत राहणार्‍या टीना राज दडवे यांनी व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी सोने तारण ठेवले होते. यासाठी, गेल्या दोन वर्षांपूर्वी जानेवारी 2022 मध्ये उरण तालुक्यातील जेएनपीटी वसाहतीतील अभ्युदय बँकेत सोने तारण ठेऊन कर्ज घेतले होते. यावेळी, बोटीच्या व्यवसायासाठी कर्ज घेण्यात आले असून बँकेचे व्हॅल्यूअर राजेंद्र काळे यांनी सोन्याचे परीक्षण करून अहवाल दिल्यावर रपथमतः सुमारे साडेनऊ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. टीना राज दडवे, नितेश उत्तमराव गव्हाणे आणि व्हॅल्यूअर राजेंद्र काळे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

11 मार्च 2022 मध्ये 242.1 ग्रॅम सोने तारण ठेवून 7 लाख 32 हजार रुपयांचे सोने तारण कर्ज टीना दडवे व चालक नितेश गव्हाणे यांनी घेतले. तर 10 मार्च 2022 मध्ये टीना दडवे यांचा चालक नितेश गव्हाणे यांच्या नावे सुमारे 455.7 ग्राम सोने तारण ठेऊन 13 लाख 89 हजार रुपयांचे सोने तारण कर्ज देण्यात आले होते. त्यानंतर, पुन्हा नितेश गव्हाणे यांच्या सुमारे 251 ग्राम सोन्यावर 7 लाख 32 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. नंतर 24 जानेवारी 2022 रोजी 422 गँम सोने तारण ठेवून 12 लाख 96 हजार रुपये सोने तारण कर्ज देण्यात आले व 13 जानेवारी 2022 रोजी 288 ग्रॅम सोने तारण ठेऊन 9 लाख 50 हजार रुपयांचे सोने तारण कर्ज देण्यात आले. दरम्यान, टीना आणि त्यांचा चालक नितेश यांनी तीन महिन्यात तीन वेळा घेतलेल्या सोने तारणच्या कर्जाची रक्कम ही तात्काळ काढण्यात आली होती. तर, टीना आणि नितेश यांनी कर्जाचे व्याज व मुद्दल न भरल्याने मार्च 2023 मध्ये त्यांची खाती ही एनपीएमध्ये गेल्याने बँकेने पैसे भरण्यासाठी तगादा लावला होता. त्यातच, टीना आणि नितेश यांनी तारण ठेवलेल्या सोन्या संदर्भात नोटीस बजावून त्याचा लिलाव काढण्याच्या सूचना देण्यात आली होती. याच दरम्यान, बँकेत ठेवण्यात आलेल्या सोन्याचे परीक्षण केले असता चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा लावण्यात आला असल्याचे मुंबईतील परेल येथील वसुली विभागामार्फत सांगण्यात आले होते. यामुळे, कर्जदार टीना राज दडवे, नवीमुंबईतील करावे येथील नितेश उत्तमराव गव्हाणे आणि बँकेचे व्हॅल्यूअर राजेंद्र काळे यांनी संगनमताने सुमारे 43.67 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार न्हावा – शेवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!