अनंत नारंगीकर
उरण : भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील जीडीएल या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामातून बंगलोर शहराकडे बॅटऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मंगळवारी (दि. २६) रात्री ८.४५ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. सदर आग ही भेंडखळ बस स्थानकाजवळील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर लागली मात्र ट्रक चालकाच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
भेंडखळ बस स्थानकाजवळील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि. २६) रात्रीच्या सुमारास घडलेल्या आगीच्या घटने संदर्भात ट्रक चालक दिनेश रमेश घावटे (रा. कोलाड, रोहा) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील जीडीएल या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामातून विद्युत वाहक बॅटऱ्या घेऊन २५ ट्रक बंगलोरच्या दिशेने मंगळवारी (दि. २६) रात्री ठिक ८.३० च्या सुमारास निघाले होते. मला तहान लागली म्हणून मी भेंडखळ बस स्थानकाजवळ पाणी घेण्यासाठी ट्रकमधून उतरलो. त्यावेळी ट्रकमधून धूर, वास येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी मी मदतीसाठी लोकांना पाचारण केले. तसेच जवळील पेट्रोल पंपावरील अग्नी प्रतिबंध उपकरणे घेऊन आग लोकांच्या मदतीने विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच १०० नंबर वर कॉल केला. परंतु, प्रतिउत्तर मिळाले नाही. त्याच वेळी आग विझविण्यासाठी जमा झालेल्या एका नागरिकाने सदर घटनेची माहिती अग्निशमन यंत्रणेला दिली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्याच दरम्यान उपस्थित नागरिकांनी, लोकांनीही सहकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अशी माहिती ट्रक चालक दिनेश रमेश घावटे यांनी दिली. मात्र ट्रकमधील २४ टन वजनाच्या बॅटऱ्या जळाल्या असल्याने सध्या रस्त्यावरील निकामी झालेल्या बॅटऱ्या उचलण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सदर घटनेमुळे दहा वर्षापूर्वी जीडीएल गोदामाला लागलेल्या आगीची तीव्रता आणि त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कामगारांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.