• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पत्रकार महेश शिंदे यांना शिवीगाळ आणि धमकी

ByEditor

Apr 1, 2024

धमकी देणाऱ्या राजकीय कार्यकर्त्याचा महाडमधील सर्व पत्रकारांकडून निषेध
कठोर कारवाई करण्याची केली मागणी

मिलिंद माने
महाड :
शहरातील दैनिक रामप्रहरचे प्रतिनिधी आणि शासन अधिस्वीकृती धारक पत्रकार महेश शिंदे यांना क्षुल्लक कारणावरून महाडमधील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक दीपक सावंत आणि त्याचा मुलगा सुरज सावंत यांनी शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हे करत असताना त्यांनी अन्य पत्रकारांना देखील अश्लील शिवीगाळ केली आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून दीपक सावंत आणि त्यांचा मुलगा सुरज सावंत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाडमधील सर्व पत्रकारांनी केली आहे.

महेश शिंदे आणि सोबतचे पत्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, याठिकाणी अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेले पाटील नामक कर्मचाऱ्याजवळ साधक बाधक चर्चा सुरू होती. त्यादरम्यान लाडवली गावामध्ये मद्य विक्री परवाना करता दोन अर्ज आले आहेत याबाबत काय झाले असे महेश शिंदे यांनी विचारले. संबंधित कर्मचाऱ्याने आपल्याला ही माहिती उपलब्ध नाही असे सांगितल्याने महेश शिंदे आणि अन्य पत्रकार तिथून निघून आले. मात्र संबंधित कार्यालयातील कर्मचारी पाटील यांनी दीपक सावंत यांना महेश शिंदे यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून देत महेश शिंदे सातत्याने तुमच्या परवान्याबाबत विचारणा करत आहेत असे सांगितले. यामुळे दीपक सावंत यांनी महेश शिंदे यांना दिनांक 29 मार्च रोजी दूरध्वनीवरून शिवीगाळ आणि धमकी दिली. त्याचप्रमाणे दीपक सावंत यांचा मुलगा सुरज सावंत हा देखील महेश शिंदे यांच्या घरी गेला आणि उद्धटपणे दादागिरीची भाषा केली. यामुळे महेश शिंदे यांचे कुटुंब पूर्णपणे घाबरले. याबाबत महेश शिंदे यांनी महाड पत्रकार संघ तसेच अन्य पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर याबाबत सर्वांनी पोलीस तक्रार दाखल करावी असा निर्णय घेण्यात आला.

माजी नगरसेवक दीपक सावंत आणि त्यांचा मुलगा सुरज सावंत यांच्या विरोधात महेश शिंदे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे महाडमधील सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तडवी यांना तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, महाड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी, रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांच्यासह जवळपास वीसहून अधिक पत्रकार उपस्थित होते.

एखाद्या कार्यालयामध्ये जाऊन माहिती घेणे हे पत्रकाराचे काम आहे मात्र विचारलेली माहिती संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणे हे चुकीचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे त्यांच्यावर देखील शासकीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली जावी अशी देखील मागणी पत्रकारांकडून केली गेली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!