बोर्ली पंचतन गुजराथी समाजाने दिल्या सुनील तटकरे यांना शुभेच्छा
गुरुवर्यांच्या आशिर्वादाने समोरच्यांना जनता एप्रिल फुल करेल- सुनील तटकरे
अभय पाटील
बोर्ली पंचतन : रायगड लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील तटकरे जोमाने आपल्या मोर्चेबांधणीला लागले असून सोमवार दि. 1 एप्रिल रोजी त्यांनी बोर्ली पंचतन येथील दक्षिण सीमर गुजराथी समाज मंदिरामध्ये जाऊन ब्रम्हचारी महंत प. पू. हिंमत जीवन बापू यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी बोर्ली पंचतन गुजराथी समाजाच्या वतीने तटकरे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

गुजराथी समाजाचे गुरू बोर्ली पंचतन येथील श्री जगजीवन बापू ज्ञानमंदिर येथे आले असता रायगड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी महंमद मेमन, दर्शन विचारे, प्रमुख प्रवक्ते शाम भोकरे, सरपंच ज्योती परकर, दिवेआगर माजी सरपंच उदय बापट, भावेश उपाध्याय, मनसुखलाल शहा, चंद्रकांत कोठारी, मयूर शहा, नंदकुमार पाटील, ऋषिकेश गोळे, सुजीत पाटील, बोर्ली पंचतन गुजराथी बांधव व इतर उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतामध्ये सुनील तटकरे म्हणाले की, गुरूवर्यांच्या आशिर्वादाने ऊर्जा, प्रेरणा मिळाली, आज 1 एप्रिल असलं तरी गुरूवर्यांचे आशीर्वाद मिळाल्याने विरोधकांना एप्रिल फुल जनताच करेल असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. आम्ही जनतेच्या सेवेचे घेतलेले व्रत यापुढेही अखंडितपणे चालू राहील असेही ते म्हणाले.