वीज कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार; ग्राहकांसोबत उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने वीज कर्मचाऱ्यांची हुकूमशाही वाढली
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यात वीजेचे बील भरूनही अनिल वामन पडते यांच्या मालकीच्या दुकानाचे वीज मीटर महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी काढून नेले आहे. विशेष म्हणजे सदर ग्राहकाला महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही नोटीस न देता, मोबाईलवर मेसेज न टाकता, न कळविता वीज मीटर काढून नेले आहे. वास्तविक पाहता वीज बील किंवा थकबाकी नसताना कोणाच्या तरी सांगण्यावरून ही द्वेषापोटी कारवाई केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोणतेही कारण नसताना वीजमीटर तोडून नेल्याने वीज कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ पून्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने वीज कर्मचाऱ्यांची हुकूमशाही उरणमध्ये वाढत चालली असून याचा शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक त्रास सर्वसामान्यांना होत आहे.
ग्राहक क्र. ०२५५२००१८०८८, अनिल वामन पडते (वय ६७ वर्षे, राहणार मोहिनील अपार्टमेंट ए विंग १०१ म्हातवली, नागाव रोड, उरण) हे नियमित वीज बिल भरत असतात. मात्र, दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी राहुल शिंदे सहाय्यक अभियंता करंजा शाखा यांच्या हाताखाली असणारे सहकारी कमल खान व इतर कर्मचाऱ्यांनी अनिल वामन पडते व त्यांच्या इमारतीचा विजपुरवठा तोडून अनिल वामन पडते यांचे वीजमीटर कोणतीही चूक नसताना काढून नेले. अनिल वामन पडते यांच्या जागेत असलेले भाडेकरू समोरच्या इमारतीत राहत होते. ते अनिल वामन पडते यांच्याकडे जागा भाड्यानी घेऊन राहत होते. समोरच्या इमारतीमधील मीटर बामणे बिल्डरच्या नावे असून त्याची थकबाकी वसुल करणेसाठी अनिल वामन पडते यांच्याकडे भाड्यानी राहायला आलेल्या भाडेकरूचा म्हणजे पर्यायाने पडते वीज ग्राहक असलेला विजपुरवठा थकबाकी नसताना भारतीय विद्युत कायदा ५६ अन्वये नोटीस न देता मेसेज मोबाईलवर न पाठवता अनधिकृतपणे अनिल वामन पडते यांना त्रास देणेच्या हेतूने वीज मीटर काढून नेले. तेव्हा अनिल पडते यांची मुलगी ॲड. अंतरा अनिल पडते अणि तिचे सहकारी ॲड. आकांक्षा ठाकूर व ॲड. चेतन लोखंडे यांनी राहुल शिंदे आणि कमल खान यांना चांगलीच अद्दल घडवली. वीज कर्मचारी कायदा हातात घेऊन या सगळ्या गोष्टी करत होते. वरून उद्धट वर्तन केले. तसेच विजपुरवठा पूर्ववत करणेस नकार दिला. जेव्हा ॲड. अंतरा अनिल पडते आणि सहकारी यांनी अधिक्षक अभियंता वाशी मंडळ यांना संपर्क केल्यावर विजपुरवठा पूर्ववत चालू केला.
दिवसेंदिवस महावितरण विभागाची मक्तेदारी वाढत आहे. फक्त बामणे बिल्डर आणि त्यांचे सहकारी किरण यांच्या सांगण्यावरून अनिल पडते यांच्या भाडोत्रीकडून पैसे वसूल करायच्या हेतूने अनिल पडते यांना त्रास दिला. सर्वसामान्य माणसांना धमकावून त्यांच्याकडून वसुली करण्याची ही कोणती नवीन पद्धत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. या सर्व घटनेबाबत अनिल वामन पडते यांनी सांगितले की, माझी भाडोत्री एक महिला असून ती अपंग आहे. तिचा एक लहान असा आइस्क्रीमचा व्यवसाय आहे. आमची काहीही चूक नसताना जवळपास ५-६ तास आमचा विद्युत पुरवठा हा खंडित केला होता. त्यामुळे माझ्या भाडोत्रीचे नुकसान झाले आहे. वीज कर्मचाऱ्यांनी उर्मट भाषा वापरून आमचे नुकसान तर केलेच शिवाय मानसिक त्रास दिला. मिटरचे कोणत्याही डिफॉल्टर लिस्टमध्ये नाव देखील नव्हते. ॲड. अंतरा अनिल पडते यांनी कमल खान यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले माझ्याजवळ ऑर्डर आहे असे सांगितले. तरी त्यांनी ऑर्डर लेखी असल्याचा पुरावा मागितला तर त्यांनी तो देण्यास नकार दिला. राहुल शिंदे आणि कमल खान यांची जणू काही हिटलरशाही चालू आहे असा प्रत्यय काल आला. नाईलाजाने जिल्हाधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक महावितरण व महाराष्ट्र राज्य विद्युत नियम आयोग यांचेकडे दाद मागावी लागत आहे असे मत अनिल वामन पडते यांनी व्यक्त केले आहे.
ग्राहक क्र. ०२५५२००१८०८८ नाव – अनिल वामन पडते (वय ६७ वर्षे, राहणार मोहिनील अपार्टमेंट ए विंग १०१ म्हातवली, नागाव रोड, उरण) यांचे बिल भरलेलं असतानाही पूर्वसूचना व नोटीस न देता विजपुरवठा खंडित करून मानसिक त्रास दिल्यामुळे राहुल शिंदे, सहाय्यक अभियंता करंजा शाखा व कमल खान (वायरमन) यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अनिल वामन पडते यांनी शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करून दाद मागितली आहे. या संदर्भात अतिरिक्त कार्यकारी अभियंता उरण यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. ग्राहकांशी, जनतेशी उद्धटपणाने वागणाऱ्या व कायदा हातात घेणाऱ्या वीज कर्मचारी राहुल शिंदे व कमाल खान यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.