भर नाक्यावरील जीर्ण इमारतीचा पहिला मजला पाडून पत्रा टाकण्याचे काम सुरू
घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्याही परवानगी न घेता तोडफोड करून अनधिकृत बांधकामे उभी रहात आहेत. याबाबत नगरपालिका बांधकाम विभागातील अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता ते बघायला लागेल असे थातुरमातुर उत्तर देऊन एकप्रकारे अनधिकृत बांधकामे उभारण्यास प्रोत्साहन देत असल्याचा संशय येत आहे. यावरून नगरपालिका बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार उघड होत आहे.

उरण नगरपालिका हद्दीतील जीर्ण व जुन्या इमारतींना धोकादायक ठरवून त्या खाली करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी देऊनही आजतागायत त्या इमारती उभ्या असून त्यामध्ये वास्तव्य अथवा दुकान सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशाच एका वर्दळीचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या गणपती चौक येथील मराठी मंदिर कपड्याचे दुकान असलेली इमारत अत्यंत जुनी झाली असल्याने ती धोकादायक ठरविली असल्याची माहिती नगरपालिकेतील एका अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधीला दिली. इमारत जुनी झाली असताना ती जमीनदोस्त करण्याऐवजी दुकानदारांनी इमारती भोवती कपडा लावून वरचा मजला पाडून त्याठिकाणी पत्रा लावण्याचे काम गेली ६ ते ७ दिवसांपासून सुरू आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता अधिकारी वर्गांनी आम्हांला माहिती नाही, बघून सांगतो असे उत्तर दिले आहे. गेली अनेक दिवसांपासून दिवस रात्र पहिला मजला पाडण्याचे काम सुरू असतानाही याची माहिती नगरपालिका प्रशासनाला नाही याचे जनतेला आश्चर्य वाटत आहे.
याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधला असता ते फोन उचलत नाही. बांधकाम विभागाचे नगरचनाकार निखिल ढेरे यांच्याकडे प्रत्यक्ष विचारणा केली असता त्यांनी नोटीस दिली असून कामाची आपणास माहिती नसून ती घेऊन आपण पुढील कारवाई करू असे सांगितले. यावेळी सदर इमारतीला देण्यात आलेल्या नोटीसची मागणी केली असता त्यांनी अर्ज करा मग देतो असे सांगितले. यावरून सदर इमारतीचा पहिला मजला पाडण्याचे काम सुरू असल्याने यामध्ये अधिकारी वर्गाचे आर्थिक साटेलोट असल्यानेच ते पुढील कारवाई करण्यास चालढकलपणा करीत असल्याचा आरोप शहरातील जनतेकडून केला जात आहे.
शहरात अशा प्रकारचे अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असूनही त्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. एका बिल्डरानी तर इमारत उभी केल्यानंतर इमारतीची ड्रेनेज टाकी नगरपालिका जागेत उभी केल्याचे समजते. यावरून नगरपालिका बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे उघड होत आहे.