खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रांताधिकारी यांची भेट
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील वाशीनाका हे ठिकाण अपघाताचा हॉटस्पॉट ठरत आहे. भुयारी मार्ग नसल्याने रस्ता ओलांडताना अनेक अपघात घडले आहेत. त्यात अनेकांना हात, पाय व डोक्याला मार लागून जखमी झाले आहेत. त्यामुळे खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली.
पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असुन अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट असून सर्व्हिस रोडची कामे सुद्धा रखडली आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागात १५ गावे व १७ वाड्या आहेत. येथील नागरिक पेण येथे रोज रोज ये-जा करीत असतात. वाशीनाका येथे भुयारी मार्ग नसल्याने रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच काँक्रीटीकरण करताना रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळे खारेपाट भागातून येणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. वडखळकडून पेणकडे व पेणकडून वडखळकडे ये-जा करणारी वाहने भरधाव वेगाने येतात. त्यामुळे रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. त्यातच रस्त्याच्या उंचीमुळे चढाव जास्त झाला आहे. त्यामुळे गावाकडून येणाऱ्या वाहन चालकांना नियंत्रण ठेवणे अवघड होत असल्याने अपघात घडत आहेत. तसेच वाशीनाका येथे गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग भरपूर असतो.
या सर्व बाबी लक्षात घेऊन खारेपाट विकास संकल्प संघटनेने पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देवुन सदर बाब लक्षात आणून दिली. प्रवीण पवार यांनी ही बाब गंभीर आहे हे लक्षात घेऊन नॅशनल हायवेचे इंजिनिअर व ठेकेदार यांना फोन करून वाशी नाका येथील काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी, समीर म्हात्रे, चंद्रकांत पाटील इतर पदाधिकारी उपस्थित होते.