अलिबागच्या नामांतराची मागणी; नार्वेकरांकडून आचारसंहितेचा भंग?
प्रतिनिधी
अलिबाग : येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील यांनी अलिबाग शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. अलिबाग शहराचे नाव बदलून मायनाक नगरी करावे अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे राकेश पाटील यांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वीच भंडारी समाजातील काही नेत्यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. मायनाक भंडारी यांचे स्मारक अलिबागमध्ये उभारावे आणि अलिबाग शहरासह तालुक्याचे नाव मायनाक नगरी असे करावे अशी लेखी मागणी राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. हे पत्र समोर आल्यानंतर अलिबागमधून या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला. अलिबागमधील सामान्य नागरीकांसह राजकीय
लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी नार्वेकर यांच्या भूमिकेचा विरोध केला आणि अलिबाग हेच नाव योग्य असून ते बदलायची गरज नाही आणि बदलावेसे वाटलेच तर सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे नाव द्यावे, अशी भूमिका घेतली. समाज माध्यमांवरदेखील याचे पडसाद उमटले.
अलिबागमधील सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील यांनीही नार्वेकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. अलिबाग या नावावरून धार्मिक व्देष पसरवून धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाला असून निवडणूकीच्या तोंडावर विशिष्ट समाजाला खुश करून त्यांना प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचे राकेश पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. राहुल नार्वेकर यांच्या मागणीमुळे अलिबागकरांबरोबरच रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून सामाजिक वातावरण कलुषित झाल्याचे राकेश पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जारी झाली आहे हे माहीत असतानाही नार्वेकर यांनी मतदारांवर प्रभाव पडेल असे कृत्य केल्याने आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड. राकेश पाटील यांनी केली आहे.