• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनमधील जलशुद्धीकरण योजना रखडल्या!

ByEditor

Apr 9, 2024

शुद्ध पाणी पुरवठा होणार कधी? तालुक्यातील बौद्धवाडीवरील महिलांची विचारणा

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटक यांच्यासाठी उपयोजना अंतर्गत जलशुध्दीकरण होऊन मिळणाऱ्या पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. वर्षभर दुर्लक्षित राहिलेल्या या योजना कधी सुरू होणार? असा संतप्त सवाल येथील गाव वाड्यातील नागरिकांतून केला जात आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग माध्यमातून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड विभागामार्फत अनुसुचित जाती व नवबौध्द घटक उपयोजना अंतर्गत शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, वाळवटी, भोस्ते, दांडगुरी, आदगाव या गावांतील बौद्ध समाजासाठी प्रत्येक वाडीवर एक वर्षापूर्वी जलशुध्दीकरण यंत्र बसविण्यात आले. या प्रत्येक योजनेसाठी आठ लाखाचा निधी वापरण्यात येणार आहे. मात्र, अद्याप यातून शुद्धपाणी नागरीकांना मिळालेच नाही. येथील जलशुध्दीकरण यंत्रणा असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच गत झाली आहे.

सरकारतर्फे तळागळात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी दलित वस्ती सुधार योजना राबविली जाते. या योजनेतून ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा अशा सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येतात. या योजने सबंधित लागणारी पाणी साठवणूक टाकी, तसेच जल शुध्दीकरण यंत्रातून घरोघरी करण्यात येणारा पाणीपुरवठा याची माहिती या गावांच्या ग्रामपंचायतकडे देखील उपलब्ध नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या जल शुध्दीकरण योजना येथील नागरिकांसाठी निरुपयोगी ठरल्या आहेत.

जल शुध्दीकरण यंत्रणाचे काम लवकरच पूर्ण करून या योजनेचा लाभ आमच्या कुटुंबांना मिळावा.

-वैशाली मोहिते,
रहिवासी, बोर्लीपंचतन बौद्धवाडी.

शासनाकडून दलितांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र, आम्हाला मिळणाऱ्या योजनेचे लाभ मिळतच नसेल तर अशा योजना आमचे कल्याण काय करणार?

-सचिन हळदे,
रहिवासी, बोर्लीपंचतन बौद्धवाडी.

तालुक्यातील जलशुध्दीकरण योजनेच्या कामाची पाहणी करून त्या लवकरच सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

-यशवंत कुमार बक्कर
ग्रामीण पाणपुरवठा अधिकारी.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!