विनायक पाटील
पेण : ३२ रायगड लोकसभा मतदार संघातील १९१ पेण विधानसभा मतदारसंघामध्ये सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दि. १०/०४/२०२४ रोजी पेण तालुक्यातील वीटभट्टी मालक व चालक तसेच पेण तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतली. पेण तालुक्यातील वीटभट्ट्यांवर आसपासच्या गावातील बरेच मजूर काम करतात. त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी द्यावी किंवा त्यांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची तसेच मतदान झाल्यानंतर पुन्हा आणण्याची व्यवस्था वीटभट्टी मालकाने करावी असे आवाहन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी केले. वीटभट्टी मालकांनी सदर आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला.
पेण तालुक्यात हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार काम करतात. त्यांनाही मतदानाच्या दिवशी हॉटेल व्यावसायिकांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे व त्यांना मतदान करण्यासाठी सुट्टी द्यावी असे आवाहन करण्यात आले. मतदान वाढवण्यासाठी मतदान करून आलेल्या ग्राहकांना मतदानाच्या दिवशी बिलामध्ये १०% सूट द्यावी व तशा प्रकारचे फलक आपल्या हॉटेलमध्ये लावावेत जेणेकरून लोकांमध्ये मतदान जनजागृती होण्यास मदत होईल असे आवाहन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी केले. हॉटेल व्यावसायिकांनी सदर आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला. पेण निवडणूक शाखेमार्फत मतदान वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहेत. त्याचा परिणाम मतदान टक्केवारी वाढण्यास होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.