रायगड : जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरीज क्लस्टर पार्कच्या स्थापनेसाठी केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या चर्मोद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. रातवड येथील मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरीज क्लस्टर पार्क हे जागतिक लेदर मार्केटमध्ये राज्याच्या निरंतर यशासाठी प्रेरक ठरेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
देशातील चामड्याच्या वस्तूंच्या उत्पादनात आणि निर्यातीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. एकट्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा देशाच्या चामड्याच्या निर्यातीत २१ टक्के वाटा आहे. याशिवाय धारावी हे राज्यातील सूक्ष्म आणि लघु चर्मोद्योगांसाठी एक भरभराटीचे केंद्र आहे. चर्मोद्योगाचे श्रमकेंद्रित स्वरूप याला प्रेरक ठरते. लेदर सेक्टरमध्ये समाजातील दुर्बल घटकांच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून रोजगारनिर्मिती व महिलांच्या सक्षमीकरणाची मोठी क्षमता असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
रायगडमध्ये मेगा लेदर फूटवेअर आणि अॅक्सेसरीज क्लस्टर पार्कची स्थापना हा एक मैलाचा दगड आहे. हा समूह उद्योग विकास म्हणजे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा मार्ग असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. यामुळे चर्मोद्योग क्षेत्राची परिसंस्था मजबूत करणे आणि राज्याच्या एकूण आर्थिक समृद्धीला चालना देण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील रातवड येथे केंद्र सरकारने चर्मोद्योग व चामड्यापासून पादत्राणे बनविणे याकरीता क्लस्टर मंजूर करून १२५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एकूण ३२५ कोटींचा हा आराखडा असून उर्वरित रक्कम शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल. चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगारासाठी नवी संधी या निमित्ताने निर्माण होत आहे.
– उदय सामंत, उद्योगमंत्री