• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग तालुक्यातील वावे गावामध्ये अमृतमहोत्सवी भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा

ByEditor

Apr 15, 2024

दिनेश तुरे
वावे-अलिबाग :
अलिबाग तालुक्यातील वावे येथे मिती चैत्र शु . ९, नवमी – शके १९४६, बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४ रोजी ७५व्या अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता श्रीराम प्रासादिक भजन मंडळ वावे : बुवा – बळीराम गावंड (संगीत विशारद रवींद्र वाघमारे यांचे शिष्य) तसेच मृदंगमणी – हरिश्चंद्र न. गावंड, दामोदर गावंड, जनार्दन गावंड (संगीत विशारद बाबुराव वाघमारे यांचे शिष्य) चालक – दिलीप पाटील, संदीप गायकर, व्यवस्थापक – वसंत गावंड, वावे ग्रामस्थ यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. श्रीराम प्रभुंच्या जन्मसोहळ्याचे पोथीवाचन सकाळी १० ते १२.३० या वेळेत होणार आहे. श्रीरामनवमी दिवशी दुपारी १२.३० वाजता मर्यादापुरुषोत्तम श्रीराम प्रभुंचा जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिभावाने संपन्न होणार आहे. भक्तजनांसाठी महाप्रसादाची व्यवस्था दुपारी १ ते ४ या वेळेत असणार आहे. तसेच भक्तजनांच्या मनोजनार्थ पंचक्रोशीतील बेलोशी, महाजने, आंदोशी, उसर, वळवली, आंबेपूर या सहा भजनी मंडळांचे कार्यक्रम दुपारी १ ते संध्या. ७ या वेळेत होणार आहेत. भक्तजनांना संगीतमय मधुरस्वरांचा आस्वाद मिळणार आहे.

श्रीराम प्रभूंची पालखी रात्री ९ वाजता विविध सजावटीने सजविलेला श्रीराम रथ चलचित्र पालखी सोहळा सोबत देवेश बेंजो पथक वावे, गावदेवी बेंजो पथक वावे, विभागातील ताशा पथक आणि पालखी सोबत वावे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लेझीम पथकांची रंगत पहायला मिळणार आहे. अशी भव्य पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. पालखी सोबत बेलोशी, महाजने, आंदोशी या पंचक्रोशीतील व गावातील टाळ मृदूंगधारी वारकरी भजने व भावगीते होणार आहेत. परंपरागत ध्वनी किरण साउंड सर्व्हिस, वळवली यांचे आहे. वेशभूषा – स्वराली ड्रेसेस थेरोंडा, विनोदिनी कोंडे व रंगभूषा महेंद्र गावंड यांची असणार आहे. तसेच वेषभुषाधारक भाविक वावे ग्रामस्थ हे श्रीराम प्रभूंच्या पालखीचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. श्रीराम प्रभूंच्या पालखी सोहळ्यात गुलालाची चौफेर उधळण करून ग्रामस्थ आपला आनंद साजरा करतात. तसेच लाठी-काठी, मल्लखांब अशा मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. आकर्षक रोषणाईने श्रीराम मंदिर उजळून निघणार आहे. टाळ मृदूंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात या अविस्मरणीय अशा श्रीराम प्रभुंच्या जन्मोत्सव सोहळ्याचा व तीर्थप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा व याची देही याची डोळा अशा या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद आपण सर्वांनी द्विगुणीत करावा असे आवाहन वावे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

नाट्यरसिकांच्या मनोरंजनार्थ शुक्रवार, दि. १९ एप्रिल २०२४ रोजी लेखक कमळाकर बोरकर लिखित “बिजली कडाडली“ या धमाल विनोदी तमाशा प्रधान दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. अशा प्रकारे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वावे ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे . श्रीराम प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन अलोट भक्तीद्वारे या मंगलमय भक्तीमय सोहळ्याचा आनंद आपण सर्वांनी लुटावा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!