अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सलीम शेख
माणगाव : घरातील कपाटातून ८० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० ते दि. १४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मौजे नाणोरे, ता. माणगाव येथे घडली. या घटनेची फिर्याद महेंद्र तुकाराम पाटोळे (वय-४३) रा. नाणोरे, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील अज्ञात चोरट्या इसमाने नाणोरे येथे फिर्यादी महेंद्र तुकाराम पाटोळे यांच्या राहते घराच्या कपाटातील रोख रक्कम ८० हजार रुपये चोरून नेले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु, रजि. नं. १०३/ २०२४ भादंवि कलम ३८० प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश समेळ हे करीत आहेत.