• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्हा परिषदेवरील प्रशासकाला 2 वर्षे पूर्ण!

ByEditor

Apr 17, 2024

‘आमदार बोले अन् प्रशासन हाले’ अशीच स्थिती; प्रशासक अजून एक वर्षभर राहणार

घनःश्याम कडू
उरण :
जिल्हा परिषदेवर 21 मार्च 2022 पासून प्रशासक राज आहे. दोन वर्षांपासून त्याठिकाणी पदाधिकारी नसल्याने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आमदारांचा विशेषतः सत्ताधारी आमदारांचा भाव या स्थानिक स्वराज्य संस्थेत वधारल्याची स्थिती आहे. आमदारांचे शिफारस पत्र असलेल्यांचे कामांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप यापूर्वी अनेक माजी पदाधिकार्‍यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांची मुदत 20 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली आणि 21 मार्च 2022 पासून या मिनी मंत्रालयावर प्रशासकराज सुरू झाले. वास्तविक पाहता पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषद व पंचायत समितीला फार महत्त्वाचे स्थान आहे. याठिकाणी उत्कृष्ट काम करणारे अनेक पदाधिकारी पुढे आमदार, मंत्री देखील झाल्याची उदाहरणे आहेत. पण, जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल दोन वर्षे या संस्थेवर प्रशासकराज पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक मातब्बर पदाधिकारी अडगळीत पडले असून त्यांना दररोज आमदारांच्या कार्यालयाचा दरवाजा ठोठवावा लागत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत अध्यक्ष, सदस्य व पंचायत समित्यांमध्ये सभापती, सदस्य असे कोणीही नसल्याने बहुतेक विभागाच्या अधिकार्‍यांचा मनमानी पद्धतीने
कारभार सुरु असल्याचा आरोप माजी सदस्य करीत आहेत. आमदारांनी पत्र दिले की लगेच काम मंजूर होते, निधी देखील मिळतो, पण आम्ही पत्र देऊन हेलपाटे मारले तरी कामासाठी मंजुरी मिळत नाही किंवा वेळेत मिळत नाही असे अनेकांचे अनुभव आहेत.

पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनानुसारच सध्या जिल्हा परिषदेचा कारभार सुरु आहे. त्यामुळे ’आमदार बोले अन् जिल्हा परिषदेचे प्रशासन हले’ अशीच सद्य:स्थिती आहे. अजून एक वर्ष प्रशासकराज शक्य 21 मार्च रोजी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवरील प्रशासकाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीपण, सध्या लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने साधारणतः जूनपर्यंत ही निवडणूक चालेल. त्यानंतर पावसाळा सुरु होईल आणि ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू होईल. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षीच होतील, अशी सद्य:स्थिती आहे. त्यामुळे आणखी एक वर्षभर जिल्हा परिषदेवर प्रशासकराज राहील.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!