राजिप शाळा कुंट्यांची गोठी येथील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
प्रतिनिधी
सोगांव : अलिबाग तालुक्यातील कुंट्यांची गोठी-वढाव खुर्द राजिप प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रतिक खारकर यांनी स्वखर्चाने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटप केले.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बामणगाव येथील प्रतिक खारकर हे एक दानशूर व्यक्तिमत्त्व असून त्यांनी मराठी शाळेला वेळोवेळी अनेक प्रकारची मदत केली आहे. शाळेतील मुलांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून व उन्हाळी सुट्टी आनंदात जावी यासाठी चित्रकला वह्या, पेन, पेन्सिल, कलरबॉक्स आदी शालेय शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप मोठ्या उत्साहाने केले. याप्रसंगी जि. प. मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रतिक खारकर यांचे आभार मानले.
