वैभव कळस
म्हसळा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत येत्या ७ मे रोजी होणाऱ्या मतदाननिमित्त १९३ श्रीवर्धन मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी अंजुमन हायस्कूल म्हसळा व न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा या दोन्ही केंद्रांना भेटी देऊन योग्य त्या सूचना प्रांताधिकारी महेश पाटील यांना दिल्या. निवडणूक कामाकरिता अनेक जिल्ह्यातून येणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांची चोख व्यवस्था व्हावी आणि कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
निवडणूक कामासाठी आलेल्या प्रत्येक कर्मचारी यांना नाश्ता, जेवण, चहा-पाणी, कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कर्मचाऱ्यांना ओआरएस सारख्या ऊर्जा निर्माण करणाऱ्या पावडर व प्रथमोपचार किट सोबत देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्याकडून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना निर्भयपणे आपली जबाबदारी पार पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या प्रसंगी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील, म्हसळा तहसीलदार समीर घारे, तळा तहसीलदार स्मिता पाटील, श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विवेक मुगळीकर, निवासी नायब तहसिलदार गणेश तेलंगे, म्हसळा पो. नि. पवन चौधरी, मंडळ अधिकारी सलीम शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
