• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तळाघर येथील ऐतिहासिक महादेवाच्या यात्रेला अलोट गर्दी

ByEditor

Apr 17, 2024

हर हर महादेवाच्या जयघोषात देवाचा लग्न सोहोळा थाटामाटात, लाखोंची उलाढाल

अमोल पेणकर
रोहे :
चैत्र महिन्यात भरविण्यात आलेल्या रोहे तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि महाराष्ट्रातील आगळीवेगळी बहुजन समाजाच्या प्रथा ,परंपरा जपणाऱ्या तळाघर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाच्या यात्रेला तसेच श्री शंभू महादेव आणी पार्वती मातेचा आगळा वेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी १६ व १७ एप्रिल रोजी दोन दिवस अलोट गर्दी झाली आहे.दरवर्षी रामनवमीच्या आदल्या दिवशी याठिकाणी रात्रौ बारा वाजता श्री महादेवाचे लग्न लागते. हे लग्न पाहण्यासाठी आणि या यात्रेचा आनंद घेण्यासाठी रोहे, मुरूड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा या ठिकाणाहून लाखो भाविक सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले. हर हर महादेवाच्या जयघोषात देवाचा लग्न सोहोळा थाटामाटात संपन्न झाला.

श्री तीर्थक्षेत्र स्वयंभू महादेव मंदीर तळाघर येथे देवाचा लग्न पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधी , मंगलाष्टके बोलुन पार पडले. तालुक्यातील खारगाव येथील नवरदेव तर धाटाव गावची नवरी असते. लग्न सोहळा पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून मोठया प्रमाणात नागरिक तसेच भाविक उपस्थित होते. सुतार, चांभार, वाणी, शिंपी, तेली, परिट, जंगम, ब्राह्मण, मराठा, कुणबी, कराडी, कोळी, लोहार , कुंभार, आगरी, नाभिक असे अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार या देवाच्या यात्रेकरीता दरवर्षी मोठ्या उत्साहाने येत असतात. दोन दिवस ही यात्रा सुरू असते. यात्रेचा मानसन्मान हा पुरातन आहे. पेशवे व सिद्धी यांच्यात झालेल्या करारात या यात्रेच्या लग्न सोहळ्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते.

धाटाव पंचक्रोशीतील तळाघर, लांढर, बोरघर ,वाशी, महादेववाडी, धाटाव यात्रा पंच कमिटी असते. यावेळी लग्न सोहळ्यास लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात. तळाघरेचे मोरे दिपमाळ लावतात, खारगाव येथून पालखी येते. मानाचे निमंत्रण देण्याचा मान बामुगडे घराण्याकडे आहे. सोनगावचे ग्रामस्थ तेलवण, वरातीचे निमंत्रण देतात. धाटाव गावातून काठी तेलवणाच्या दिवशी येते. शिवपार्वतीची प्रतिष्ठापना उत्तर काठीवर होते. वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात. किल्ला व तळाघर गावातील करवला करवली उभे असतात. मंगलाष्टक बोलण्यासाठी धाटाव, लांढर, भुवनेश्वर, वाशी, महादेव वाडी, देवकान्हे येथील जंगम असतात.

ऐतिहासिक आणि आगळावेगळा लग्न सोहळ्याच्या वेळी सुतार व भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेऊन विवाह सोहळ्यास बसतात. नवरीकडील धाटाव व नवरदेवाकडील खारगावची मंडळी व वरसगावची मंडळी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच बहुसंख्येने कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी निघणाऱ्या मानाच्या काठ्यांची पूजा आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी विनोदभाऊ पशिलकर, संदीप तटकरे, समीर शेडगे, अनिल भगत, सुरेश मगर, शंकरराव भगत, ज्ञानेश्वर साळुंके, हरिश्चंद्र मोरे, संतोष माने, हरिश्चंद्र माने, गुणाजी पोटफोडे, लीलाधर मोरे, विठ्ठल मोरे, दगडु बामुगडे, लक्ष्मण स्वामी जंगम यांसह परिसरातील नागरिक, बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर लग्न सोहळ्यास रोहे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुपडे उपस्थित होते. यात्रेत काठी नाचवण्याची परंपरा आहे. तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून भव्यदिव्य आशा काठ्या सजवून येतात. लग्न सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते. यात्रेस मोठया प्रमाणात गर्दी असते. लग्न सोहळ्यास, यात्रेस नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच राम नवमीला दुपारी तिर्थासाठी यात्रेकरूंची तसेच भक्तगणांची उसळलेली अलोट गर्दी पाहवयास मिळाली.

याठिकाणी काव्या नाचवण्याचा प्रकार हा अतिशय विहंगमय असतो. तसेच काठीसाबोत गाणी आणि ढोलताशे तर यात्रेकरूना करमणूक म्हणून आकाश पाळणे, मौत का कुंवा मोटरसायकल, लहान मुलांसाठी आकर्षित विविध जेम्स आणि खेळ, मिठाईची दुकाने, हॉटेल्स, आईस्क्रीम, लहान मुलांची खेळणी, वस्तु, मौत का कुवा, करमणूक साधने अशा विविध प्रकारची रेलचेल सुरु होती. खालुवाजाच्या सनई तसेच ढोलताशांच्या निनादात सुरू असलेल्या काठ्यांच्या भव्य मिरवणुकीने उपस्थित भाविकांबरोबर लहानग्यांचा आनंद काही औरच असल्याचे दिसले. राम नवमी तथा राम जन्मोत्सवनिमित्त २ दिवस भरलेल्या या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असल्याने दिवसेंदिवस या यात्रेची व्याप्ती वाढतच आहे. म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, तळा, रोहा तालुक्यातील बहुजन समाजाला सामावून घेणारा हा रामनवमी उत्सव म्हणजे एकात्मतेच्या प्रतीक असल्याची भावना अनेकांच्या मुखातून ऐकावयास मिळत होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!