किरण लाड
नागोठणे : चैत्र शुक्ल अष्टमीच्या दिवशी रामनवमीचा उत्सव नागोठण्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात तसेच भक्तीभावाने साजरा करण्यात आला. नागोठण्यातील गवळआळी, जोगेश्वरी नगर तसेच केएमजी विभागात असणारे जुने रामेश्वर मंदिर, ब्राह्मण आळीतील प्रभु रामाचे मंदिर अशा प्रसिद्ध श्रीरामाच्या मंदिरात, साईबाबांच्या मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दुग्धाभिषेक, ध्वजपुजन, पुजाविधी, होमहवन, मुर्तीवर पुष्पवृष्टी, महाआरती अशा धार्मिक विधी मंत्रघोषात मंदिरात सकाळपासून चालू होत्या. प्रभुरामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भक्ताने सकाळपासून गर्दी केली होती.विशेष म्हणजे अयोध्यात पाचशे वर्षोने प्रभुरामाचे मंदिर उभे राहिले आणि रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्यानंतरच्या रामनवमीला यंदा विशेष महत्व आले आहे. मंदिरात दिवसभर श्रीरामाचा जयघोष टाळ, मृदंगाच्या गजरात चालू होता. संध्याकाळी श्रीरामाची पालखी, साईबाबांची पालखी मंदिरातून निघाल्या. ढोल ताशाच्या, बॅन्जोंच्या तालावर रामभक्तांनी ताल धरला होता. अत्यंत तल्लीन होऊन भक्त प्रभुरामाचा नामघोष करीत होते आणि त्या भक्तीच्या गजरात पालखी हळूहळू पुढे जात होती.
महिलांनी घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. फटाके फोडून पालखीचे स्वागत ठिकठिकाणी केले जात होते. संपूर्ण परिसरात बांधलेल्या भगव्या पताका भक्तांचे लक्ष वेधून घेत होत्या. सगळीकडे वातावरण भक्तीमय झाले होते. जोगेश्वरी नगरमधील निघालेली पालखी रात्री मंदिरात पोहोचली. नंतर आरती होऊन भक्त्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गवळआळीतील श्री साईबाबांच्या मंदिरातून निघालेली पालखी मोठ्या भक्तीभावात, उत्साहात रात्री मंदिरात आली आणि आरती होऊन रामनवमी उत्सवाची सांगता करण्यात आली. अशाप्रकारे नागोठण्यात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तीभावात, जल्लोषात साजरा करण्यात आला.
