• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांचा उमदेवारी अर्ज दाखल

ByEditor

Apr 18, 2024

अलिबागमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमदेवारी अर्ज दाखल

अमुलकुमार जैन
अलिबाग :
इंडिया नावाची आघाडी दिशाहीन आहे. इंडिया आघाडीला नेतृत्व नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए देशात काम करीत आहे. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. या नेतृत्वाखाली बलशाली देश, राज्य बनविण्याच्या भूमिकेतून ही निवडणुक लढवित आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष, रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-शिवसेना शिंदे गट-भाजप-रिपाइं (आ.) महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुनील तटकरे यांनी गुरुवारी (18 एप्रिल) अलिबागमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भाजपचे नेते, मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे प्रतोद आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, माजी आमदार धैर्यशिल पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी कुरुळ बायपास येथे महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा. तटकरे मार्गदर्शन करीत होते.

यावेळी व्यासपीठावर महायुतीतील घटक पक्षाचे नेते रायगडचे पालकमंत्री डाॅ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, योगेश कदम, महेंद्र दळवी, महेश बालदी, अनिकेत तटकरे, महेंद्र थोरवे, शेखर निकम, विनय नातू, सू्र्यकांत दळवी, किरण सामंत, धैर्यशील पाटील, नितीन सरदेसाई, दिलीप भोईर यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे म्हणाले की, 18 लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. ही निवडणूक या देशाचे उद्याचे जगाच्या पातळीवरचे स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर जगात या देशाला गाैरवाचे स्थान मिळण्यात यश मिळाले आहे. शेजारच्या राष्ट्रामध्ये धाक निर्माण केला गेला आहे. देशातील सर्वधर्मियांना संरक्षण देण्यासाठी या सरकारने पावले उचलली. देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्त्यांचे जाळे निर्माण केले गेले. पण सर्वाधिक काम हे महिलांच्या विविध योजनांच्या माध्यमातून झाले आहे. देश सशक्त बनविण्यासाठी महिलांची ताकद निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. महिलांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली. जलजीवनसारखी क्रांतीकारी योजना आणली. घराघरात पाणी देण्याचे काम या सरकारने केले म्हणूनच देशातील महिला मोदी सरकारच्या योजनांचे स्वागत करीत आहेत.

कोकणच्या विकासातील महत्वाचा टप्पा अटल सेतू पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जपानच्या पंतप्रधानांबरोबर असलेले साैहार्दाचे संबंध यामुळे कर्ज मिळून हा काेकण आणि मुंबईला जाेडणारा पूल पूर्ण झाला. सागरी महामार्गाचे स्वप्न बॅ. अंतुलेसाहेबांनी पाहिले. या मार्गातील पुलांना राज्य सरकारने दहा हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, समृद्धी महामार्ग पूर्ण झाले. मुंबई-गाेवा महामार्गाच्या कामाला चालना मिळाली. आपल्या विनंतीमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गासाठी 700 कोटी रुपयांचा निधी दिला. खासदारांनी काय काम करायचे हे अनंत गीते यांनी समजून घ्यायला पाहिजे, असा टोला खा. तटकरे यांनी लगावताना सांगितले की, गीते यांना गेली तीस वर्षात हे त्यांना काम करता आले नाही. रायगड जिल्हयातील मेडिकल काॅलेजसाठी राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांची निधी दिला आहे. तसेच मुस्लीम बांधवांची इच्छा होती युनानी काॅलेज व्हावे. या युनानी काॅलेजला चाेवीस तासात मंत्रिमंडळाने मजुरी देऊन त्याचा जीआर निघाला आहे. यावर्षी जुलै महिन्यात पहिली बॅच युनानी काॅलेज सुरु होईल.
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तर राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. हे केवळ रायगड लोकसभा मतदारसंघापुरते मर्यादित नाही. 48 जागा महायुती लढतिवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून 45 प्लसचा निर्धार करायचा आहे. त्यापद्धतीने काम करायचे आहे, असे ते म्हणाले.

भाजपाचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, गावातील असणारा प्रत्येक बूथ हा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता आणि अनेक जण त्यात ताकतीस आहे. महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता ताकीद आहे. ही निवडणूक देशासाठी आहे. देशातील पुढच्या पिढीत भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रपणे एकत्रपणे त्या बूथ वरती सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम करणे गरजे आहे.

शिवसेनेचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, सुनील तटकरे यांना रत्नागिरीतून फार मोठ मताधिक्य दिले जाईल. केंद्रातला सरकार असेल राज्यात सरकार असेल जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राज्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी सुनील तटकरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज्याते वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मार्गदर्शन करताना म्हणाले, सुनील तटकरे यांच्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत, त्यामुळे त्याचा विजय निश्चित आहे. येथे आल्यावर मला प्रथम आमदार योगेश कदम भेटले. त्यांनी सांगितले, पहिल्यांदा आम्ही घडाळाला मतदान करणार आहेत. मीही त्यांना सांगितले कोल्हापूरला आम्ही पहिल्यांदा धनुष्यबाणाला मतदान करणार आहोत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे. अलिबागमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊ सुरु झाले आहे. त्या इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे. एक हजार कोटी रुपयांचा निधि मंजूर केला आहे. युनानी काॅलेजसाठी 80 कोटी मंजूर केले आहेत. मेडिकल काॅलेजपासून 30 किमी ग्रामीण सेंटर 200 कोटी खर्च करून उभारणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेचे प्रतोद आ. भरत गोगावले, यांनी घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचा बटन दाबून आपल्याला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मताधिक्याने निवडून आणायचे आहे असे सांगताना पंतप्रधान मोदी जशी गॅरंटी आहे तशी खासदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आमची गॅरंटी घ्यावी, असे आवाहन केले.

भाजपचे नेते माजी आमदार धैर्यशिल पाटील यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून महायुतीच्या उमेदवारासाठी काम करायचे असल्याचे सांगितले. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आश्वासन आ. महेंद्र दळवी यांनी दिले. आमदार रवींद्र चव्हाण, आरपीआयचे सीताराम कांबळे यांचेही भाषण झाले.

अलिबाग शहरानजिक झालेल्या या महायुतीच्या सभेस घटकपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर आभार ॲड. महेश मोहिते यांनी मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!