घन:श्याम कडू
उरण : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)ने 2023 साली भारत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यातील वर्ग 1 ची पदे जसे जिल्हाधिकारी, राजदूत, उपजिल्हाधिकारी, वेगवेगळ्या विभागाचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस उपयुक्त भरण्यासाठी ही खडतर परीक्षा घेतली होती. त्यामध्ये अक्षय लांबे ही परीक्षा 908व्या रँकनी उत्तीर्ण झाला आहे.
पोलीस दलात मोठा अधिकारी होण्याचा अक्षयचा मानस आहे. अक्षयचे वडील दिलीप लांबे हे भारत सरकारच्या सीआईएसएफ या खात्यात आपली सेवा देतात. ही सतत बदली होणारी नोकरी आहे. अशातच 2001 ते 2005 या दरम्यान ते जेएनपीटी येथे कार्यरत असताना अक्षय केंद्रीय विद्यालय एनएडी करंजा या शाळेत शिकत होता. लहानपणापासून अभ्यासाची प्रचंड आवड त्याला होती. अक्षयचे अधिकारी बनण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल. अक्षय लांबे आयएएस परीक्षा पास झाल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामध्ये द्रोणागिरी ट्रॅकर्स ग्रुपच्या सर्व सभासदाकडून अक्षयला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवसेना नरेश रहाळकर, उरण तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष घनश्याम कडू, उरण तालुका केमिस्ट असोसिएशन अशा विविध मान्यवरांकडून अक्षयचे कौतुक करण्यात आले.
