विश्वास निकम
कोलाड : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कोलाड विभाग कोलाड कुणबी समाजाचे अध्यक्ष संदेश लोखंडे यांचा पुत्र सिद्धांत लोखंडे (वय २३) याचे शनिवारी (१३ एप्रिल) आकस्मित निधन झाल्याने लोखंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर परीसरात शोककळा पसरली आहे.
लहान थोरांसह साऱ्यांचा लाडका भाई सिद्धांत लोखंडे हा अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचा होता. दहावीनंतर त्याने उच्च शिक्षण घेत बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग कोर्स पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज लोणेरे रायगड या विद्यापीठात शिक्षण घेत मागील वर्षी डिग्री प्राप्त केली. गुणवत्तेत हुशार असा गोंडस सिध्दांत याचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाल्याने लोखंडे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मुलाला चांगले शिक्षण देवूनही आई वडीलांच्या पदरी निराशा आली असून सिद्धांत याच्या अचानक जाण्याने त्याच्या मित्र परिवारात तसेच समाजात आंबेवाडी कोलाडसह परीसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या निधनाची वार्ता समजताच लोखंडे यांचे नातलग तसेच समाज बांधव सामजिक, शैक्षणिक, राजकीय, तसेच विविध क्षेत्रातील असंख्य समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते तसेच सिध्दांत याला विविध स्तरांतून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
सिद्धांत याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार असून त्याचे दशक्रिया विधी सोमवार, २२ एप्रिल रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर पाली येथे होणार आहेत तर उत्तरकार्य गुरूवार, दि. २५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी मौजे आंबेवाडी येथे होणार आहेत.
