वार्ताहर
वढाव-पेण : पेण तालुक्यातील वाशी खारेपाट भागातील वढाव येथील पूर्वा प्रमोद म्हात्रे (वय १३) हिचा कावीळ या आजाराने मृत्यू झाला असून पूर्वा हिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पेण तालुक्यासह वाशी खारेपाट भागात सध्या कावीळ या आजाराने थैमान घातले असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे रुग्णांचा नक्की आकडा समजू शकला नाही. या आजाराने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच कावीळमुळे दिव गावातील १० वर्षाच्या मुलाचे निधन झाल्याची घटना ताजी आसतानाच वढाव गावातील पूर्वा म्हात्रे या १३ वर्षीय मुलीचा कावीळमुळे मृत्यू झाला. पुर्वाला कावीळची लागण झाली असल्याने तिला पेण येथून ७ दिवसापूर्वी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, या आजारासोबत सुरु असलेली पूर्वाची झुंज अपुरी पडली आणि पूर्वाचा मृत्यू झाला. तिच्या जाण्याने परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.
