सर्व कंपन्यांचे उत्पादन ठप्प झाल्यामुळे कारखान्यांना झळ
शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या सर्व कंपन्यांकडून आलेल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) केंद्राच्या टाकीनजिक गवता ठिकाणी अचानक रविवारी (ता. २१) रोजी सकाळी ११ वा.च्या सुमारास कडाक्याच्या उन्हामुळे आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले आणि या दुर्घटनेत दूषित पाणी शुद्ध करणाऱ्या सामाईक जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य व परिसरात जादा पडून असलेल्या जलवाहिन्यांनी अचानक पेट घेतल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. या आग दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, जल शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र निकामी झाल्याने येथील संपूर्ण कंपन्यांचे उत्पादन व अन्य कामकाज ठप्प झाल्याने सर्व कंपन्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

रोहे तालुक्यातील धाटाव एमआयडीसी भागातील सर्व रासायनिक कंपन्यांचे दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामाईक जल शुद्धीकरण केंद्र (सीईटीपी) प्लांटला आग लागल्याने धाटाव एमआयडीसीत पुन्हा एकदा खळबळ उडाली. या टाकीचे पाईप एचडीपी असल्याने त्यांनी तातडीने पेट घेतल्याने ते जळाले. या घटनेनंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. या धुरामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाल्याचे पहावयास मिळाले. ही आग भर दुपारी लागल्याने त्यातच हवेचे प्रमाण जास्त असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने २ अग्निशमन दलांना पाचरण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र, जलशुद्धीकरण केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सदर सीईटीपी प्लांट धाटाव एमआयडीसी अंतर्गत असून या प्लांटच्या देखभाल दुरुस्तीचे काम एका एजन्सी दिले आहे. आग दुर्घटनेनंतर प्लांटमध्ये दूषित पाणी प्रक्रियेसाठी वाहतूक करणारे मुख्य पाईप जळाल्याने या भागातील रासायनिक कंपन्यांना आपापल्या कंपनीतील दूषित सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रात सोडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम होऊन लाईन पूर्ववत होत नाही तोपर्यंत एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांचे उत्पादन बंद राहणार आहे. अर्थातच या अगीच्या घटनेनंतर सीईटीपीपेक्षा अन्य कंपन्यांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. याठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक अनिल कुचेकर यांनी पत्रकारांना आत जाण्यापासून रोखले आणि मज्जाव केल्यामुळे सर्व पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.
उन्हाचा तडाखा प्रचंड असल्याने या परिसरातील सांडपाणी वाहिन्यांचे पाईप गरम झाले होते. आग कशामुळे लागली हे अद्याप तरी सांगता येणार नाही. मात्र, याठिकाणी बरेच पाईप जळाल्याने धूर तयार झाला आणि आग संपूर्णपणे नियंत्रणात आम्ही आणली आहे.
-हरेश्र्वर पाटील
अग्निशामक अधिकारी, रोहा औद्योगिक वसाहत
आज दुपारी अचानक लागलेली आग कुठे लागली हे समजेलच नाही. मात्र, याठिकाणी धुराचे लोट पसरल्यामुळे या परिसरातील नागरिक वर्ग प्रचंड भयभीत झाले होते.
-बाळकृष्ण रटाटे
अध्यक्ष, सोनारसिद्ध ग्रामस्थ मंडळ धाटाव
