दोन मुस्लिम युवकांनी दाखविले माणूसकीचे दर्शन; पोलिसांनी केले कौतुक
सलीम शेख
माणगाव : एसटी बसमधून सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना माणगांव पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. मुस्लिम युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवीत दागिन्यांची बॅग परत केल्याने माणगांव पोलिसांनी त्यांचे कौतुक केले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. २० एप्रिल रोजी तक्रारदार मंगला सकपाळ, रा. ठाणे या चिपळुण येथून ठाणे येथे गूहागर ते अर्नाळा विरार बस क्र. एमएच १४ बीटी २५८१ एसटी बसने प्रवास करीत असताना बस माणगांव एसटी स्टॅन्ड येथे आली असता त्यांचे जवळील बॅगमध्ये असलेले रु. ४,५०,००० किमतीचे सोन्याचे दागीने हे बॅगसह बसमधील गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले असल्याची तक्रार माणगांव पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारदार यांच्या समवेत बसमध्ये कुबेब हनिफ जांभारकर (वय २५, विद्यार्थी), महम्मद शब्बीर जांभारकर (वय १५ वर्षे, विद्यार्थी) या व्यक्ती देखील त्यांच्यासोबत गुहागर ते अर्नाळा बसमधून तळी, गुहागर ते माणगांव असा प्रवास असताना कुबेब हनिफ जांभारकर याने माणगांव बस स्टँड येथे उतरताना नजरचुकीने तक्रारदार यांची बॅग स्वतःची आहे असे समजून सोबत नेली होती. ते श्रीवर्धन येथे पोहोचल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, त्याने नजरचुकीने स्वतःची समजून दुसऱ्याच कोणाची बॅग आणली आहे. त्यावर त्याने ती बॅग न उघडता तशीच ठेऊन दि. २२ एप्रिल रोजी सकाळी स्वतःहून माणगांव पोलीस ठाणे येथे आणून जमा केली. दोन्ही मुस्लिम बांधवांनी माणूसकीचे दर्शन घडवीत बॅग परत केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी, पो. नि. राजेंद्र पाटील, सपोनि मनोज भोसले यांनी त्यांचे कौतूक करून माणगांव पोलीस ठाणे येथे त्यांचा सत्कार केला.
