दिघी सागरी पोलीस ठाण्याची कारवाई
अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावची ग्रामदेवता जांभुळकरीण देवीचे मंदिरामधील साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने लाकडी दरवाज्याच्या कडी व कोयंडा उचकाटण्याचा व स्टीलच्या सळई उचकटण्याचा प्रयत्न करणारे दोघे मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडले असून त्या दोघांना आज अटक करण्यात आली आहे. या कारवाई बद्दल दिघी सागरी पोलीस ठाण्याचे कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील वडवली ग्रामदेवता जांभूळकरीन देवीचे मंदिर गावाच्या बाहेर वसलेले आहे. 19 एप्रिल रोजी या मंदिरातील पुजारी विनोद बिऱ्हाडी हे सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे साफसफाई व पूजा करण्यासाठी गेले असता मंदिराचे मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता दक्षिणेकडील दरवाजा मंदिराच्या आतून उघडण्यास गेले असता त्या दरवाजाच्या स्टीलच्या सळई वाकलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 18 एप्रिल रोजी रात्री 10:15च्या सुमारास दोन इसम आरोपी गणेश चाळके व दिनेश मांजरेकर हे दक्षिणेकडील दरवाजाची सळई वाकवून मंदिरात प्रवेश करीत मंदिरातील साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले त्यावरून पुजारी विनोद बिऱ्हाडी यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून आरोपींवर दिघी सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 55/2024 भादवि कलम 457, 380, 511,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आज दि. 22 एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे.
