• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव ट्रॉमा केअर सेंटर कागदावरच!

ByEditor

Apr 22, 2024

नागरिकात संताप, महामार्गावरील विविध अपघातानंतर प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर

सलीम शेख
माणगाव :
माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दिवसेंदिवस ‘अपडेट’ होत असून महामार्गावरील अपघातग्रस्त रूग्ण उपचार करण्यापासून ते विविध आजारावरील रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाशेजारी ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झाले होते. मात्र, गेले अनेक दिवस या ट्रॉमा केअर सेंटर उभारणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. मुंबई-गोवा व दिघी-पुणे अशा महत्वाच्या राष्ट्रीय मार्गावर अनेक वेळा विविध अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे. मात्र, हे ट्रॉमा केअर सेंटर उभारणीला शासनाला मुहूर्त सापडत नसल्याने हे ट्रॉमा केअर सेंटर फक्त कागदावरच उरले आहे. त्यामुळे रुग्ण व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

माणगाव तालुक्यासह अन्य तालुक्यातून नागरिक उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. सामान्य नागरिकांना खासगी, महागडी रुग्णसेवा परवडत नसल्याने दक्षिण रायगडसह नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक रुग्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. नवनवीन उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री, पुरेसा ऑक्सिजन साठा, डायलिसिस विभाग यामुळे हे रुग्णालय कात टाकत आहे. माणगाव ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाल्यामुळे रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत आणखी एक भर पडणार असून माणगावची आरोग्य यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरमुळे अधिक बळकट होणार आहे. मात्र, हे ट्रॉमा केअर सेंटर गेले अनेक दिवस कागदवरच राहिले असून हे सेंटर उभारणीसाठी शासन एक पाऊल पुढे कधी टाकणार असा प्रांजळ सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रस्त्यावरील अपघातग्रस्त रुग्णावर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचणार आहेत. मात्र, या ट्रॉमा केअर सेंटरला २ वर्षापूर्वी मंजुरी मिळाली असून ते आजही कागदावरच राहिले आहे. या ट्रॉमा केअर सेंटर उभारणीला मुहूर्त कधी सापडणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय हे विविध रुग्णांच्या आजारावर व विविध शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक विभाग सज्ज आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सिटीस्कॅन मशीनची गरज आहे. ती आजही उपलब्ध नाही. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटरचीही फार मोठी गरज भासत होती. महामार्गावरील हे महत्वाचे ठिकाण असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, दापोली तसेच विविध तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. शिवाय दक्षिण रायगडमधील पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा, पाली येथूनही रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. ट्रॉमा केअर सेंटर व सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित झाल्यास माणगावात रुग्णावर निदान व उपचार होऊन त्या रुग्णांना जीवदान मिळेल अशी अशा नागरिकांना वाटत आहे.

माणगाव पंचायत समितीची स्वतंत्र इमारत गेली १६ वर्षापूर्वी माणगाव प्रशासकीय भवन लगत भव्य स्वरुपात शासनाने बांधली आहे. त्याठिकाणी जि. प. च्या विविध विभागाचे काम सुरू आहे. मात्र, राजिपच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांची कार्यालय आजही या जुन्या इमारतीत सुरू आहेत. या इमारती लगत माणगाव उपजिल्हा रुग्णालय असल्याने या ठिकाणी शासनांने ट्रॉमा केअर सेंटर दोन वर्षांपूर्वी मंजूर केले असून ही जागा शासनाने उपजिल्हा रुग्णालयाकडे वर्ग केली आहे. त्या जागेवर ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीचा आराखडा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आल्याचे समजते. मात्र, हे काम कधी सुरू होणार? हा संशोधनाचा भाग आहे. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!