मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या पैसे, वस्तूवर निवडणूक आयोगाच्या पथकाची करडी नजर
सलीम शेख
माणगाव : ३२ रायगड लोकसभा मतदार संघात मतदारावर वेगवेगळ्या पक्ष उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी वापर केला जावू नये. यासाठी निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी स्थिर सर्व्हेक्षण पथके तैनात करण्यात आली असून ती सक्रीय झाली आहेत. त्यामुळे मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या पैसे, वस्तू यावर निवडणूक आयोगाच्या पथकाची करडी नजर राहणार आहे.
माणगाव तालुक्यात पुणे-माणगाव मार्गावर रायगड हद्दीत ताम्हिणी घाटात एक तसेच माणगाव-दिघी रस्त्यावर मोर्बा येथे एक व मुंबई–गोवा महामार्गावर लोणेरे येथे एक असे तीन स्थिर सर्व्हेक्षण पथके रात्रंदिवस २४ तास काम करीत आहेत. या पथकांना आठ–आठ तास असे दिवसाचे कामाचे तास वाटून नेमुणूक केल्या आहेत. हे पथके येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर तसेच एखादे वाहन संशयास्पद आढळून आल्यास त्यांना थांबवून त्या वाहनाची तपासणी केली जात आहे. त्यामुळे निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पक्ष, उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर निवडणूक आयोग बारकाईने लक्ष ठेवून आहे. याबाबत अनुचित प्रकार करण्याऱ्यावर प्रतिबंधत्मक कारवाई केली जाणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
