अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील आगरसुरे फाटा ते सातीर्जेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाण्याने भरलेला टँकर पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी होऊन ठार झाला तर टँकर मालक गंभीर जखमी झाला.
याबाबत मांडवा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वा.च्या सुमारास एमएच ०६ बीयु १६६६ हा पाण्याने भरलेला टँकर चालक मंगेश दत्तात्रेय करळकर (६१, रा. मुशेत) हे आगरसुरे फाटा ते सातीर्जे ह्या मार्गावरून जात असताना टँकर चालक यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर उजव्या बाजूला जात नदीवरील पुलाची लोखंडी रेलिंग तोडून पुलावरून खाली कोरड्या नदीपात्रात कोसळला. या अपघातात टँकर चालक मंगेश करळकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर टँकरमध्ये सोबत असलेले टँकर मालक योगेंद्र गोविंद नार्वेकर(६५) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मांडवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. लांडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी यांना बाहेर काढून पिंट्या गायकवाड यांच्या रुग्णवाहिकेतुन अधिक उपचारासाठी अलिबाग येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची फिर्याद आदिक मोहन नार्वेकर रा. चोंढी यांनी मांडवा पोलिसांना दिली असून अधिक तपास मांडवा पोलीस ठाण्याचे व्ही. जी.पाटील हे करीत आहेत.