• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

टेम्पोमध्ये कोंबलेल्या चार बैलांची सुटका

ByEditor

Apr 29, 2024

अज्ञात वाहनातून टेम्पोवर दगडफेक; टेम्पोचालक देखील त्याच वाहनातून फरार?

अमुलकुमार जैन
अलिबाग :
बैलांची तस्करी करणार्‍या संशयित टेंपोचा पाठलाग करून टेंपो पकडण्यात आला आहे. टेंपो चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. गोरक्षकांनी टेंपोची पाहणी केली असता चार बैल आढळून आले. त्यापैकी एक गंभीर अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेंपो आणि चार बैल ताब्यात घेतले असून संशयित आरोपींविरोधात पशु अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पोमधून बैलांची तस्करी होणार असल्याची माहिती नवी मुंबईमधील गोरक्षक आणि विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई गोवा महामार्गावर पाळत ठेवली होती. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास एक संशयित टेंपो भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आल्यानंतर टेंपोचा पाठलाग सुरू केला होता. पनवेल तालुक्यातील शिरढोण परिसरात टेंपो गोरक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच टेम्पोच्या आसपास असलेल्या एका काळ्या रंगाच्या वाहनातून टेंपोवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत टेम्पोची (एमएच 03 इजी 2235) काच फुटली व त्याच दरम्यान टेम्पोचालक त्या काळ्या रंगाच्या वाहनातून फरार झाला.

टेंपोजवळ पोहोचलेल्या गोरक्षकांनी टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये चार बैलांना बसण्यासाठी तसेच उभे राहण्याची जागा नसताना बैलांच्या मानेला आणि पायांना दोरीने घट्ट बांधून दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. पनवेल पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी चार बैल आणि टेंपो जप्त करून ताब्यात घेतले. टेंपोत गुंगीचे इंजेक्शन देखील आढळून आले.

टेम्पोमध्ये एन्टी स्लीपरी मटेरीयर, चारा पाण्याची व्यवस्था, वेस्ट मटेरियल टँक, निमल फस्ट एड किट, सेपरेट पार्टिशन कंपार्टमेंट, वेटरनरी सर्जन यांचे हेल्थ सर्टिफिकेट आणि ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट न बाळगता जनावरांना गुंगीचे औषध देऊन वेदना होतील अशा पद्धतीने बेकायदेशीर वाहतूक तसेच जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी विक्रांत डिंगोरकर, चेतन देशमुख, किरण शिंदे, सचिन गायकवाड, अविनाश सापल्य, दर्शन आगाज, रूतिक गायकवाड, शैलेश जगनाडे यांच्यासह परेश मुरबाडकर आदींनी प्रयत्न केले. फरार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली.दरम्यान बैलांना पनवेल मधील पांजरपोळ येथे पाठवण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!