क्रीडा प्रतिनिधी
पोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या संस्थेच्या ६२व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या झुंझार पोयनाड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत आर. जे रॉयल्स संघांनी अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. अंतिम सामन्यात जय मल्हार ११ संघाचा पराभव करत स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले.
दिनांक २७ व २८ एप्रिल रोजी झुंझार युवक मंडळाच्या सुसज्ज अशा मैदानावर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, दिपक साळवी, अजय टेमकर, माजी सरपंच भूषण चवरकर, सदस्य अजित चवरकर, किशोर जैन, क्रीडा प्रमुख नंदकिशोर चवरकर, शैलेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धा हि झुंझार युवक मंडळाच्या सर्व आजी माजी खेळाडू,व्यापारी असोसिएशनचे सदस्य व पोयनाडच्या सर्व युवा खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक संघाला संघमालक व आयकॉन खेळाडू दिला होता व नंतर औक्शन करून सर्व सहभागी खेळाडूंना विविध संघात विभागून देण्यात आले. खेळाडूंनी परिधान केलेल्या विविध रंगांच्या गणवेशात खेळाडू झळकून दिसत होते. दोन दिवस उत्स्फूर्तपणे खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला.
संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळ करणाऱ्या चैतन्य राऊत याला मालिकावीर व अंतिम सामन्यासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ फलंदाज मृण्मय पालव, उत्कृष्ठ गोलंदाज राहुल जैन तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून प्रणय साळवी यांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम १० हजार कै. देवेंद्र जाखु पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दत्त हॉटेल व सिद्धिविनायक हॉटेलचे मालक ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांच्याकडून तर भव्य आकर्षक चषक कै. कृष्णा विष्णू तावडे यांच्या स्मरणार्थ निखिल तावडे यांच्याकडून विजयी संघ आर. जे. रॉयल्स संघमालक राज जैन व कर्णधार चैतन्य राऊत यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम ६ हजार व चषक जय मल्हार संघाचे संघमालक विकास कामठे व कर्णधार प्रणय साळवी यांना देणार आला. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, माजी सरपंच अनिता गंभीर, माजी सरपंच भूषण चवरकर, संध्या पाटील, किशोर तावडे, दिपक साळवी, नंदकिशोर चवरकर, सुजित साळवी, व्यापारी असोसिएशनचे सदस्य किशोर जैन, भरत जैन, जितेंद्र जैन, महेश अग्रवाल, प्रदिप जैन, अक्षय अग्रवाल, आरोग्य कर्मचारी संघटना रायगडचे अध्यक्ष अमोल खैरनार, शैलेश पाटील, ॲड. पंकज पंडित, देवेंद्र गंभीर, पंच संदीप जोशी, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्यासह पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सर्व प्रमुख सदस्य, ग्रामस्थ व खेळाडु मोठ्या संख्येने उपस्थित होते.