किरण लाड
नागोठणे : 18व्या लोकसभेसाठी 32 रायगड लोकसभा मतदार संघातुन महायुतीकडून निवडणुकीसाठी उभे असणारे सुनील तटकरे यांना महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटना नागोठणे विभागाने पाठिंबा दिला आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी निवडणूक होत आहे.या मतदार संघासाठी महायुतीकडून सुनील तटकरे तर महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांच्यासह 13 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. दोन्ही बाजुकडून प्रचार जोरात चालू असून प्रचारसभा, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, रॅली यावर जोर देतांना उमेदवार तसेच त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघात दिसत आहेत. रायगड मतदार संघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना परत निवडून आणण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर माथाडी कामगार संघटनेनी कंबर कसली आहे.
माथाडी कामगारांचे कैवारी, आराध्य दैवत, आमदार कै. अण्णासाहेब पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या कामगारांना एकत्र करण्याचे काम सन 1968 पासुन केले. त्यांच्या या लढ्याला मार्च 1969 ला यश आले. महाराष्ट्र विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 कायदा संमत करण्यात आला. माथाडी कामगारांना न्याय मिळून देण्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे योगदान मोठे आहे. या नेत्याने माथाडी कामगारांना वेळोवेळी केलेली मदत येथील कामगार कदापी विसरु शकणार नाही. म्हणुन येथील माथाडी कामगार संघटनेने रायगडचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. विकासाचे महापुरुष, कामगारांचे कैवारी सुनील तटकरे यांना नागोठणे विभागातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार माथाडी कामगार संघटनेचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष दिनेश घाग, मनेष बोंडेकर, चिंतामण बावदाणे, हरेश झोरे, मंगेश बोंडेकर, लक्ष्मण बावदाणे, प्रकाश बोंडेकर, राम कोकरे आदी माथाडी कामगार तसेच संघटनेचे पदाधिकारी यांनी केला आहे.