• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गावागावात जत्रांची धुम!

ByEditor

May 2, 2024

उरण तालुक्यात श्री रत्नेश्र्वरी देवीची सर्वात मोठी जत्रा

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यात आगरी, कोळी, कराडी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या समाजातील बांधवांच्या ग्रामदैवताच्या जत्रा उत्सवाला सध्या गावागावात सुरुवात झाली आहे. त्यामुळे या समाजाबरोबर इतर समाजातील बांधव गावोगावच्या ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील जसखार गावातील श्री रत्नेश्र्वरी देवीची जत्रा, पालखी उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. यावेळी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय, भक्तगण उपस्थित राहून श्री रत्नेश्र्वरी देवीच्या चरणी माथा टेकवून आपापल्या कुटुंबाला सुख समाधान दे अशा प्रकारचे साकडे घालतात.

उरण तालुक्यातील जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवी, करंजा गावातील श्री द्रोणागिरी देवी, नवीन शेवा गावची श्री शांतेश्र्वरी देवी, डोंगरी गावची श्री अंबामाता, चिरनेर गावची श्री गावदेवी माता, फुंडे गावची श्री घुरबादेवी, कोप्रोली गावची श्री जरीमरी आई, कोट गावचा श्री राघोबा देव तसेच इतर गावाचे ग्रामदैवत श्री बापूजीदेव या ग्रामदैवतांच्या जत्रा उत्सवाला सुरुवात ही कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या जत्रा उत्सवानंतर झाली आहे. जसखार गावातील श्री रत्नेश्र्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून संपूर्ण रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात देवीची ख्याती आहे. एक जागृत देवस्थान म्हणून हजारो भक्त दरवर्षी रत्नेश्वरी देवीच्या चरणी माथा टेकवतात. देवीचे नवीन भलं मोठ मंदिर देखील भाविक भक्तांना एक भक्तिमय अनुभव देऊन जात आहे. अशा ग्रामदैवताच्या जत्रा उत्सवाला सध्या सुरुवात झाली असून हजारो, लाखो भाविक हे आपल्या लाडक्या ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करताना दिसत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!