घन:श्याम कडू
उरण : मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज शनिवार, दि. ११ रोजी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रचार करण्यावर उमेदवारासह पदाधिकारी व कार्यकर्ते भर देत होते.
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी लढत होत आहे. महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे हॅट्रिक करण्यासाठी मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज जरी प्रचाराच्या तोफा थंड झाल्या असल्या तरी आर्थिक रसद व छुपा प्रचार खऱ्या अर्थाने दोन रात्र सुरू राहणार आहे. उमेदवार व त्यांचे नेतेमंडळी विरोधकांना रसद किंवा इतर आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा लागणार आहे. फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे. सोमवार, दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. निकाल मात्र ४ जून रोजी लागणार आहे. तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे.