मिलिंद माने
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ आज सायंकाळी एका वृध्द इसमाला रस्ता ओलांडताना टॅंकरची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र, महामार्गावर पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले स्कायवॉक केवळ दिखावा म्हणून असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाडजवळ सायंकाळी ५ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चांभारखिंड येथे महामार्ग ओलांडून जात असताना किसन लक्ष्मण मोरे (वय ७०) यांना मुंबईकडून येणारा टॅंकर क्र. एमएच ४३ बीएक्स ०८३८ ची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, करोडो रुपये खर्चुन या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन स्कायवॉक उभारले आहेत. मात्र याचा एक टक्काही उपयोग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक करताना दिसून येत नाही. यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे उदाहरण या निमित्ताने पुढे आले आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग व वाहतूक विभागाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.