• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न; ३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

ByEditor

May 13, 2024

५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान, ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह

गणेश पवार
कर्जत :
देशाच्या १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. मावळ मतदारसंघात ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान आज दि. १३ मे रोजी पार पडले. यामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० मिनिटांच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सायंकाळी बाहेर पडणारा मतदार पाऊसामुळे अडकून पडला. दरम्यान, पावसाच्या विघ्नामुळे मतदानाच्या टक्क्यांवर देखील परिणाम झाला आहे.

मावळ मतदारसंघात गेले काही दिवस प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या. अशात दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने असल्याने लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर आज दिनांक १३ रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तर शहरी भागात साधारण ११ नंतर तुरळक मतदार दिसत होते. ११ नंतर उन्हाचा तडाखा बसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील कर्जत दहीवली, कशेळे, धामोते, नेरळ दहीवली, कोठिंबे आदी भागात दुपारी देखील मतदार गर्दी करून होते. तर धामोते, कर्जत दहीवली येथील मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले. तसेच नेरळ येथील ८१ क्रमांक आनंदवाडी केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले होते. दरम्यान, १८९ कर्जत मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.१५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.२७ %, दुपारी १ वाजेपर्यंत २९.४७ %, दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.०३% तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान पार पडले. अशात दुपारी ३.३० वाजता अवकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे ऊन कमी झाल्यावर बाहेर पडण्यासाठी थांबलेला मतदार अडकून पडला. साहजिकच याचा फटका हा उमेदवारांना बसणार आहे.

मावळ मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. येत्या ४ जून रोजी निकाल असणार आहे. तेव्हा या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

कमळू रामा आगीवले (९५) आणि भागीबाई कमळू आगीवले (८५) यांनी फणसवाडीवरून भर पावसात पायी चालत नेरळ जवळील आनंदवाडी, मतदान केंद्र क्रमांक-८१ येथे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. हे ज्येष्ठ जोडपे म्हणजे आजच्या पीढीसाठी अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे, असे मत नेरळ-22 चे क्षेत्रीय अधिकारी डॉ. रवींद्र मर्दाने यांनी व्यक्त केले. हल्ली माणसं मतदान करण्यात दिरंगाई करतात तेव्हा वयोवृद्ध नागरिक देशाच्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी कसे सजग आहेत हे दाखविणारे बोलके उदाहरण आहे. विशेष म्हणजे हे केंद्र दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत गांभीर्याने यशस्वीपणे चालविले. या मतदान केंद्रात मतदान केंद्राध्यक्ष कैलास घोडके, नितीन भानवसे, रमेश संकपाळ, जनार्दन पानमंद, प्रभाकर कर्णूक आदी दिव्यांगांचा समावेश होता.

कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांना पथक निहाय एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३४९ कंट्रोल युनिट आणि ३४९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप केले होते. ही प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या अधिपत्याखाली पार पडली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!